राजा टाईल्स-करंबळ क्रॉस रस्त्याच्या कामाबाबत सर्वपक्षीय नेत्यांचे निवेदन
कामाबाबत सर्वपक्षीय नेत्यांचे निवेदन : एका बाजूने रस्ता सुरू करण्याची मागणी : रस्त्याच्या दर्जाबाबत तडजोड करण्यात येऊ नये : सर्वपक्षीय नेत्यांची मागणी
खानापूर : एकात्मक विकास योजनेतून राजा टाईल्स ते करंबळ क्रॉसपर्यंतच्या रस्त्याच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येत असल्याने या रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून नियोजन करण्यात येत आहे. कंत्राटदाराने पंधरा दिवसापासून कोणतीही पूर्वसूचना न देता दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम सुरू केल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच याचा परिणाम व्यापाऱ्यांवरही मोठ्या प्रमाणात झाल्याने या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी आणि व्यापाऱ्यांनी शुक्रवारी बांधकाम खात्याचे अधिकारी गस्ती यांना निवेदन देवून एका बाजूने रस्ता सुरू करावा, तसेच रस्त्याच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करण्यात येऊ नये, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
राजा टाईल्स ते करंबळ क्रॉसपर्यंत या चार कि. मी. च्या रस्त्यासाठी एकात्मिक विकास योजनेतून 14 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याचे काम गेल्या पंधरा-वीस दिवसापूर्वी कंत्राटदाराने सुरू केले आहे. हेस्कॉम कार्यालयापासून ते नदी पुलापर्यंत तसेच रुमेवाडी क्रॉस येथून करंबळ क्रॉसपर्यंत दोन्ही बाजूचा रस्ता उखडून कामाला सुरवात केली आहे. त्यामुळे हा रस्ता कोणतीही पूर्वसूचना न देता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नंदगड,अनमोड तसेच चापगाव, रुमेवाडी क्रॉस परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्ता बंद केल्यामुळे बस वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. तसेच शहरासह जांबोटी क्रॉस ते रुमेवाडी क्रॉसपर्यंतच्या परिसरातील व्यापाऱ्यावर मोठा प्रमाणात परिणाम झाला आहे. यामुळे शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी आवाज उठविला असून शुक्रवारी व्यापाऱ्यासह सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून अधिकाऱ्यांना जाब विचारला.
यावेळी म. ए. समितीचे प्रकाश चव्हाण, मुरलीधर पाटील, भाजपचे संजय कुबल, प्रमोद कोचेरी, राजेंद्र रायका, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून रस्ता बंद करण्यासाठी परवानगी न घेता मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद का केला. तसेच एका बाजूच्या रस्त्याची वाहतूक सुरू ठेवून रस्त्याचे काम का हाती घेण्यात आले नाही. तसेच रस्त्याच्या दर्जाबाबत हलगर्जीपणा झाल्यास रस्त्याचे काम बंद पाडून उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना शहरातील एक बाजूच्या रस्त्याची वाहतूक सुरू करण्यात येईल, आणि एका बाजूचे काम हाती घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच दर्जाबाबत कोणतीही तडजोड करणार नसल्याचे सांगितले. यावेळी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने रस्त्याचा आराखडा आणि डीपीआर द्यावा, अशी मागणी केली. याचीही पूर्तता करण्यात येईल, असे सांगितले. आराखड्यानुसार रस्त्याचे काम करावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी शामराव पाटील, पंडित ओगले, शेखर दामले, नारायण काटगाळकर,बी. बी. पाटील, शंकर सुळकर, गुलाब जैन, दिलीप पोळ यासह व्यापारी आणि सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.