देशवासियांचे कुंकू पुसणाऱ्यांना 'ऑपरेशन सिंदूर'चोख प्रत्युत्तर होते
कारिवडेचे सुपुत्र सुभेदार मेजर संजय सावंत यांचे प्रतिपादन ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अतुलनीय कामगिरीबद्दल सावंतवाडीत सत्कार
सावंतवाडी । प्रतिनिधी
"कोकणवासीयांनी केलेला सत्कार हा माझा नसून वर्दी घातलेल्या प्रत्येक सैनिकाचा आहे. देश आहे तर मी आहे, हा सन्मान माझ्या देशाचा आहे. देशासाठी लढावं, देशासाठी मरावं, सन्मानाने जगावं हेच प्रत्येक सैनिकाचे उद्दीष्ट असते असे प्रतिपादन पाकिस्तानविरुद्धच्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अतुलनीय कामगिरी करून भारताची मान उंचावणारे सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावचे सुपुत्र सुभेदार मेजर संजय सावंत यांनी आज येथे केले .माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी येथील गुरुकुल येथे आज सुभेदार मेजर संजय सावंत यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते . यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर ,माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग, माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे, मनोज घाटकर, दीपक सावंत, रवी राऊळ, रत्नाकर माळी, उमेश खटावकर, दत्तू नार्वेकर, बंड्या तोरसकर, लवू पार्सेकर, मंगेश गोसावी, अजित सावंत, सत्यवान साईल आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने सावंतवाडीकर उपस्थित होते. यावेळी सुभेदार मेजर संजय सावंत सत्कार स्वीकारताना व्यक्त केलेले उद्गार हे प्रत्येक भारतीयाला स्फूर्ती देणारे होते. यावेळी मेजर सावंत म्हणाले की 'ऑपरेशन सिंदूर' हे भारतीय लष्कराच्या शौर्याचे आणि रणनितीचे एक ज्वलंत उदाहरण आहे. या ऑपरेशनमध्ये सुभेदार मेजर संजय सावंत यांनी बजावलेली भूमिका अत्यंत निर्णायक होती. त्यांनी स्पष्ट केले की, 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वी होण्यामागे मुख्य कारण होते 'एअर डिफेन्स' . भारतीय सैन्य दलाच्या एअर डिफेन्स युनिटमध्ये त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. "आमच्या देशवासीयांचे कुंकू पुसणाऱ्यांना 'ऑपरेशन सिंदूर' हे चोख प्रत्युत्तर होते," असे ते ठामपणे म्हणाले. या अतुलनीय कामगिरीबद्दल देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वतः सुभेदार मेजर सावंत आणि त्यांच्या टीमचे कौतुक करत शाबासकी दिली होती. देशाच्या सर्वोच्च संरक्षणमंत्र्यांकडून मिळालेली ही थाप ही त्यांच्या कार्याची सर्वोच्च पावती ठरली.
जन्मभूमीतील सत्काराचे अनमोल महत्त्व आणि मातीशी जोडलेली नाळ
सुभेदार मेजर संजय सावंत यांचा यापूर्वीही अनेक ठिकाणी सत्कार झाला आहे, परंतु सावंतवाडीतील या सत्काराचे महत्त्व त्यांच्यासाठी अनमोल होते. ते म्हणाले, "माझे यापूर्वीही अनेक सत्कार झाले. मात्र, माझ्या जन्मभूमीत झालेला सन्मान माझ्यासाठी विशेष आहे, कारण माझी नाळ इथल्या मातीशी आणि माणसांशी जोडलेली आहे." त्यांच्या या शब्दांत त्यांच्या जन्मभूमीबद्दल असलेले निस्सीम प्रेम आणि अभिमान स्पष्ट जाणवला.आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी सांगितले की, त्यांचे प्राथमिक शिक्षण आरपीडीत झाले दहावीत तीनवेळा नापास झालो परंतु निराश झालो नाही जे लक्ष ठेवले होते ते गाठले .. त्यांनी आपले गुरुवर्य म्हणून वासुदेव गोसावी आणि व्ही.बी. नाईक यांचा उल्लेख करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
संरक्षणमंत्र्यांशी थेट संवाद: "मरहट्टे हटते नहीं!"
सत्काराला उत्तर देताना सुभेदार मेजर सावंत यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबतच्या भेटीचा एक अत्यंत रोमांचक आणि अविस्मरणीय किस्सा सांगितला. त्यांनी आठवण करून दिली की, पहेलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने कसे डोळ्याला डोळा लावला नाही आणि शत्रूला पुरून उरले. ते म्हणाले, "येथील देवदेवतांचा आशीर्वाद, आम्ही घेतलेलं कठोर प्रशिक्षण आणि अथक परिश्रम यामुळेच आम्ही यशस्वी झालो."जेव्हा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांचे कौतुक केले, तेव्हा त्यांच्यात झालेला संवाद हा प्रत्येक सैनिकाच्या मनात असलेली देशाप्रतीची निस्सीम निष्ठा दर्शवतो. सुभेदार मेजर सावंत म्हणाले, "संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मला भेटायला आले होते. त्यांनी मला हात मिळवला तेव्हा मी त्यांना एकच गोष्ट बोललो की, जर सीजफायर होण्यापूर्वी अजून चार तास दिले असते, तर आम्ही पाकिस्तानला नकाशावरून मिटवून टाकले असते!" सुभेदार मेजर यांच्या या धैर्याने आणि ठाम वक्तव्याने राजनाथ सिंह प्रभावित झाले आणि त्यांनी त्यांच्या चीफकडे पाहत उद्गार काढले, "मरहट्टे हटते नहीं! चाहे उनकी जान जाए!" हा संवाद केवळ एका सैनिकाचा गौरव नव्हता, तर 'मरहट्टे' अर्थात महाराष्ट्राच्या वीर परंपरेला मिळालेली सर्वोच्च दाद होती.या क्षणाचे वर्णन करताना सुभेदार मेजर सावंत यांनी सांगितले की, हे कौतुक केवळ माझे वैयक्तिक नसून, माझ्या जिल्ह्याचे, माझ्या महाराष्ट्राचे आणि संपूर्ण एकशे चाळीस कोटी भारतीयांचे आहे, याचा मला अभिमान आहे.