दशावतार कलेला राजाश्रय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे प्रतिपादन ;''माझा लोकराजा'' महोत्सव कुडाळात संपन्न
कुडाळ -
कोकणच्या दशावतार लोककलेला शेकडो वर्षाची परंपरा आहे. दशावतारी कलाकारांनी पारंपरिक कलेचा गाभा बदलणार नाही. याची काळजी मात्र घेतली पाहिजे. सिंधुदुर्गातील कलाकार एकसंध पाहायला मिळतात. ही एकजूट अशीच कायम ठेवा.तुम्ही संघटित राहा.महायुतीच्या माध्यमातून व आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून दशावतार लोककलेला राजाश्रय देण्यासाठी आम्ही शंभर टक्के कटिबद्ध आहोत ,अशी ग्वाही शिवसेना ( शिंदे गट) जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी कुडाळ येथे ''माझा लोकराजा'' महोत्सवाच्या कार्यक्रमात सोमवारी दिली. न्याय मिळाला पाहिजे तर एकजुटीतून आपली ताकद उभी केली पाहिजे. जिल्ह्यातील सर्व दशावतार कलाकारांचा लवकरच कुडाळ येथे मेळावा घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.कुडाळ तालुका पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघटनेच्यावतीने कुडाळ येथील श्री देव कुडाळेश्वर मंदिरात माझा लोकराजा महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे हे तिसरे वर्ष होते. हा कार्यक्रम जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाला. कुडाळच्या नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर - बांदेकर , कुडाळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र भांड,नगरसेविका चांदणी कांबळी व नगरसेवक विलास कुडाळकर , शिवसेना ( शिंदे गट) जिल्हा सरचिटणीस दादा साईल,उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर,कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, मालवण शहरप्रमुख दीपक पाटकर, पणदूर हायस्कूलचे शिक्षक अविनाश वालावलकर, दीपक पाटकर , ज्येष्ठ दशावतारी कलाकार यशवंत तेंडोलकर ,पखवाज अलंकार महेश सावंत,अँड पी.डी देसाई , प्रेमानंद देसाई,अँड. सोनू गवस, सिंधुदुर्ग जिल्हा पारंपरिक दशावतार कलाकार संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम उर्फ बाळू कोचरेकर, केरवडे उपसरपंच अर्जुन परब, दिलीप सावंत,दशावतार कलाकार पपू नांदोसकर,दत्तप्रसाद शेणई,सुधीर तांडेल व सिद्धेश कलिंगण,विनायक घाडी, दिनेश शिंदे ,स्वरूप वाळके, लाजरी क्रिकेट ग्रुपचे स्वरूप सावंत व दीपक भोगटे , श्री कुडाळेश्वर उत्सव मंडळाचे विलास ( बाळा ) राऊळ ,नीलेश कुडाळकर व महेश मडवळ ,अक्षय कासले तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. दत्ता सामंत म्हणाले,पूर्वीच्या काळातील कलाकारांनी अतिशय कठीण परिस्थितीत ही कला जोपासली. नवीन कलाकार या कलेकडे मोठ्या प्रमाणात येत आहेत.त्यांनी ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे. आता तर महायुतीचे सरकार आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर या जिल्ह्यामध्ये आहेत. संस्कृतिक मंत्री आशिष शेलार या जिल्ह्याचेच सुपुत्र आहेत. त्यामुळे दशावतार कलाकारावर कोणताही अन्याय होणार नाही.तुमचा प्रश्न आमदार निलेश राणे यांनी हाती घेतला आहे. ते काम जबाबदारीने पूर्ण केल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत. दशावतारी कलाकारासाठी वर्षातून एकदा तरी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करा.त्यासाठी आमचे आर्थिक सहकार्य राहील,असे त्यांनी सांगितले. प्राजक्ता बांदेकर ,सुरेश धुरी ,अविनाश वालावलकर व रवींद्र भांड यांनीही शुभेच्छा दिल्या.ज्येष्ठ दशावतार कलाकार कै.महादेव लोट ( भडगाव ) व दशावतारातील ज्येष्ठ पखवाज वादक कै.अशोक नेरुरकर ( नेरूर ) यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. कै.लोट यांच्या पत्नी कल्पना लोट व मुलगा शैलेश लोट यांनी , तर कै.नेरुरकर यांचा मुलगा श्याम नेरूरकर यांनी सत्कार स्वीकारला. तसेच दशावतारातील ज्येष्ठ कलाकार सुरेश धुरी ( माणगाव ) , ज्येष्ठ हार्मोनियम वादक प्रकाश आकेरकर ( आवेरे ) व ज्येष्ठ कलाकार पंढरीनाथ सामंत ( आंदूर्ले ) यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ , सन्मानपत्र ,सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे या सत्काराचे स्वरूप होते.दहावी -बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दशावतारी कलाकारांच्या गुणवंत पाल्याचा गुणगौरव करण्यात आला. सहकार्य करणारे दाते व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कुडाळ तालुका पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघटनेचे अध्यक्ष चारुदत्त तेंडोलकर यांनी स्वागत,सूत्रसंचालन हरेश नेमळेकर,सन्मानपत्र वाचन संघटनेचे सल्लागार मोरेश्वर सावंत, तर आभार विघ्नराजेंद्र कोंडूरकर यांनी मानले. संघटनेचे पदाधिकारी - सदस्य तसेच तालुक्यासह जिल्ह्यातील कलाकार तसेच नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यानंतर कुडाळ तालुक्यातील दशावतार कलाकारांनी रक्तपिसासू रक्ताक्षी नाटक सादर केले.