केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या प्रगतीचा केंद्रबिंदू
भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत लांडगे यांचे प्रतिपादन ; अर्थसंकल्प प्रचार अभियानाचा शुभारंभ
सावंतवाडी : प्रतिनिधी
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ हा देशातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून तयार करण्यात आला आहे. यामध्ये कामगार, शेतकरी, मच्छीमार आणि असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी भरघोस तरतूद करण्यात आली असून, हा अर्थसंकल्प देशाच्या प्रगतीचा नवा मार्ग प्रशस्त करणारा आहे," असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश संघटन सरचिटणीस हनुमंत लांडगे यांनी येथे केले.भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र कामगार मोर्चाच्या वतीने सावंतवाडी येथे 'केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७' च्या प्रचार आणि प्रसार अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून श्री. लांडगे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक राणे, माजी नगराध्यक्ष प्रेमानंद साळगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव, कोकण प्रभारी नारायण सावंत, संतोष तळवणेकर, संतोष भाट, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत,रावजी राणे, बाबली तुळसकर, आबा माणगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.कोकणच्या विकासाबाबत बोलताना श्री. लांडगे म्हणाले की, "सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील काजूला जागतिक स्तरावर 'नंबर वन ब्रँड' करण्यासाठी 'प्रीमियम जिओ टॅगिंग' केले जाणार आहे. यामुळे बागायतदारांचा आर्थिक स्तर उंचावेल. तसेच कोकण रेल्वेचे सक्षमीकरण आणि वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळणार आहे. रस्ते, हवाई आणि सागरी वाहतुकीच्या पायाभूत सुविधांमुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल."अर्थसंकल्पात कंत्राटी आणि असंघटित कामगारांसाठी विमा संरक्षण आणि सामाजिक सुरक्षेची हमी देण्यात आली आहे. 'स्किल्ड इंडिया'च्या माध्यमातून युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन प्रत्येक हाताला काम देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली."एकीकडे शेजारील देश भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे काँग्रेसकडून अर्थसंकल्पाबाबत नकारात्मकता पसरवली जात आहे. मात्र, गेल्या ११ वर्षांत मोदी सरकारने ४४ वर्षांचा रखडलेला विकास पूर्ण केला आहे," अशी टीकाही लांडगे यांनी केली.माजी नगराध्यक्ष प्रेमानंद साळगावकर यांनी अर्थसंकल्पातील तांत्रिक आणि आर्थिक तरतुदींचे महत्त्व विषद केले. तर जिल्हाध्यक्ष अशोक राणे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पातील निधी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.या कार्यक्रमात नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत नारायण सावंत यांनी केले, तर सूत्रसंचालन रवी जाधव यांनी केले. या कार्यक्रमाला कामगार पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.