खेळाडूंनी खिलाडू वृत्तीने खेळून वेंगुर्ल्याचे नाव जिल्ह्यात रोशन करावे
गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांचे प्रतिपादन
वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले कॅम्प मैदान येथे होत असलेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा महोत्सवात वैयक्तिक व सांघिक लहान व मोठा गटाच्या मैदानी स्पर्धेत केंद्रबल गटाच्या स्पर्धेत यश प्राप्त केल्यानंतर तालुकास्तरीय स्पर्धेत सहभाग मिळालेल्या खेळाडूंनी खिलाडू पध्दतीने खेळ करून तालुक्यात क्रमांक पटकावावेत. तसेच आपल्या तालुक्याचे नाव जिल्ह्यात रोशन करण्यासाठी चांगल्या पध्दतीने खेळावे. असे प्रतिपादन वेंगुर्ले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांनी वेंगुर्ले तालुकास्तरीय शालेय बाल कला, क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी केले.सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती वेंगुर्लेतर्फे वेंगुर्ले कॅम्प मैदान येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय शालेय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचा शुभारंभ वेंगुर्ले पंचायत समितीच गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी क्रिडा शपथ घेतली. तसेच गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलीत केल्यानंतर ती मैदान परीसरात खेळाडूंनी क्रीडा ज्योत फिरवली.या महोत्सवाचा उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांत गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, केंद्रप्रमुख नितीन कदम, लवू चव्हाण, शिक्षक समितीच अध्यक्ष सिताराम नाईक, कोकण विभाग सचिव संतोष परब, पंचायत समितीचे अधिक्षक महेश नाईक, अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे तेजस बांदीवडेकर, शिक्षक भारतीचे सागर कानजी, सत्यशोधक शिक्षक सभेचे जिल्हा सचिव शंकर जाधव, तसेच पंचायत समितीचे कर्मचारी, बीआरसीचे कर्मचारी, तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व खेळाडू विद्यार्थी यांचा समावेश होता.
आमदार दिपक केसरकर यांचेकडून खेळाडू विद्यार्थी व महोत्सवास शुभेच्छा
कांही तांत्रिक कारणामुळे वेंगुर्ले कॅम्प मैदान येथे होणाऱ्या वेंगुर्ले तालुकास्तरीय शालेय क्रीडा महोत्सवास येऊ न शकलेल्या आमदार दीपक केसरकर यांनी संपर्क करून खेळाडूंना व महोत्सवात शुभेच्छा दिल्या असल्याचे गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांनी स्पष्ट केले.