वकिलाला कायद्यानेच नट बनवले !
ॲड राजेंद्र रावराणे यांचे प्रतिपादन ; सावंतवाडीत नवोदित वकिलांसाठी आख्यान
सावंतवाडी । प्रतिनिधी
वकिलाला कायद्यानेच नट बनवले, वकिलाचा युनिफॉर्म हे देखणेपणाचे त्याच्या विद्वत्तेचा आदर आहे. वकिलाने प्रोफेशनल इथिक पाळायला हवेत. पैसे कमावण्यापेक्षा आपली ही एक प्रकारची सेवा आहे हा दृष्टिकोन पाळून वकिली व्यवसायात उतरावे.वकिलाकडे नम्रता हवी. अभ्यास करण्याची वृत्ती हवी. प्रत्येक गोष्टी शोध घेता यायला हवा. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर. असे तुमचे वागणे असेल तर तुम्ही निश्चितपणे आदर्श वकील बनू शकता. असे मत सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे माजी जिल्हाध्यक्ष तथा वक्ते ॲड. राजेंद्र रावराणे यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथील न्यायालयात सावंतवाडी तालुका वकील संघटना यांच्यावतीने लेक्स डिस्कशन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वात वकिलांची जबाबदारी आणि कायदे आणि नियम याविषयी वक्ते ॲड. रावराणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड बी . बी रणशूर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बार असोसिएशनचे माजी जिल्हाध्यक्ष ,ज्येष्ठ वकील ॲड. दिलीप नार्वेकर उपस्थित होते. यावेळी ॲड रावराणे पुढे म्हणाले. खरंतर वकील हा उत्तम नट आहे त्याला कायद्यानेच नट बनवले आहे. त्याचा युनिफॉर्म हीच त्याची वेगळी ओळख आहे. समाजापरी जबाबदारी आणि त्याचे पालन करणे हे वकिलाचे कर्तव्य आहे. वकिलाच्या विद्वत्तेचा आदर हे त्याचे व्यक्तिमत्त्व आहे.ज्येष्ठांचा आदर राखणे हे आपले कर्तव्य आहे. बार कौन्सिलचे नियम आहेत त्याचेही तंतोतंत पालन करणेही आवश्यक आहे. बार कौन्सिल ही जबाबदार संस्था आहे . वकील हा नेहमीच विद्यार्थी असतो वकिलाकडे व्यासंगी गुण असायला हवेत . उत्तम अभ्यासू वकील हे नाव तुम्हाला मिळवायचे असेल तर तुम्ही ब्रीफ वाचणे गरजेचे आहे. संपूर्ण चार्जशीट तुम्ही उत्तम प्रकारे वाचून काढायलाच हवी. पक्षकार हा वकिलाचा आरसा आहे.. पक्षकार जे तुम्हाला सांगेल त्याची गोपनीयता तुम्ही ठेवायला हवी . नैतिक मूल्य जपणे, ती पाळणे हे कर्तव्य वकिलाचे आहे. कोर्टात तुमचा शब्द फायनल असतो. वकिलाबाबत असणारा विश्वास हीच त्याची खरी ओळख असते जेव्हा तुम्ही तुमचा विश्वास संपादन कराल आणि विश्वासाला पात्र होऊन तुम्ही काम कराल तेव्हा निश्चितपणे तुम्ही एक आदर्श वकील म्हणून तुमची वेगळी ओळख निर्माण होईलअसे त्यांनी स्पष्ट केले . यावेळी सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे तालुकाध्यक्ष. ॲड बीबी रणशूर यांनी नवोदित वकिलानी अभ्यासपूर्ण या व्यवसायात यायला हवे . एक चांगला वकील होण्यासाठी आपली तब्येत चांगली ठेवली पाहिजे. व्यासंग मग तो वाचनाचा असो किंवा समाजसेवेचा जपला पाहिजे, आपल्या व्यवसायाशी समोरच्या वकिलाशी आपल्या पक्षकाराशी आणि मुख्य म्हणजे कोर्टाशी प्रामाणिक राहील पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले यावेळी प्रास्ताविक. ॲड स्वप्निल कोलगावकर तर सूत्रसंचालन ॲड रत्नकर गवस तर उपस्थितांचे आभार ॲड रणशूर यांनी मानले.