रामगोपाल यादव यांच्याकडून विधान मागे
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रामजन्मभूमी प्रश्नी निर्णय देण्याआधी मी देवाकडे प्रार्थना केली होती, या सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या विधानावर केलेली टीका समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी मागे घेतली आहे. जेव्हा तुम्ही मुडद्यांना जिवंत करता, तेव्हा त्यांची भुते होतात, अशी टिप्पणी रामगोपाल यादव यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या विधानावर केली होती. मात्र, आता त्यांनी ती मागे घेतली.
यादव यांच्या या प्रतिक्रियेवर मोठा गदारोळ उठला आहे. भारतीय जनता पक्षानेही या टिप्पणीचा समाचार घेतला आहे. सोशल मिडियावर अनेकांनी यादव यांची ही टिप्पणी समाजाला घातक असल्याची टीका केली असून यादव यांना मोठ्या प्रमाणातवर ट्रोल करण्यात येत आहे. त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया समाजमाध्यमांवरुन काढून घेत असल्याची घोषणा सोमवारी केली.
कण्हेरसर येथे विधान
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कण्हेरसर या त्यांच्या मूळ ग्रामी त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आला होता. याच ग्रामी यमाई देवीचे दर्शन त्यांनी घेतले होते. त्यानंतर सत्काराच्या कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी रामजन्मभूमीच्या प्रकरणाचा उल्लेख केला होता. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर निर्णय देण्याच्या आधी मी देवाची प्रार्थना केली होती, असे विधान करताना त्यांनी या कार्यक्रमात आपली श्रद्धायुक्त भावना व्यक्त केली.
टीकेचे लक्ष्य
त्यांच्या या विधानावर काही ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणवून घेणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी टीका केली होती. निर्णय देण्याची बुद्धी देव देत असल्यास सर्वसामान्य माणसांची जी प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत, तीसुद्धा देवाच्या आशीर्वादाने हातावेगळी करावीत. तसे केल्यास सर्वोच्च न्यायालयावर कामाचा दबाव आहे, तो नाहीसा होईल, अशी खोचक टिप्पणी काँग्रेस नेते उदीतराज यांनीही रविवारी केली होती. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
मालवीय यांचे शरसंधान
भारतीय जनता पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान शाखेचे प्रमुख अमित मालवीय यांनी रामगोपाल यादव यांच्या विधानावर धारदार टीका केली आहे. यादव यांनी असे अश्लाघ्य विधान करुन सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा अवमान केला आहे, असेच न्यायव्यवस्थेविषयीही अनादर व्यक्त केला आहे. राज्यघटनेच्या नावाने गळा काढणारे हे नेते स्वत:च कशाप्रकारे राज्यघटनेची पायमल्ली करतात हे रामगोपाल यादव यांच्या विधानावरुन स्पष्ट होते, असे प्रतिपादन मालवीय यांनी केले.