For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ST च्या पाल्यांना विदेशी शिक्षणाची संधी, दरवर्षी 20 पाल्यांची होणार निवड

03:54 PM Jun 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
st च्या पाल्यांना विदेशी शिक्षणाची संधी  दरवर्षी 20 पाल्यांची होणार निवड
Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नव्या शैक्षणिक क्षितिजांची दारे खुली होणार आहेत.

Advertisement

By : इंद्रजित गडकरी

कोल्हापूर  : राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) ने आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी महत्त्वाकांक्षी आणि कल्याणकारी योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांच्या मुलांना परदेशात उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. परदेशी शिक्षण अग्रीम योजना म्हणून ती ओळखली जात आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नव्या शैक्षणिक क्षितिजांची दारे खुली होणार आहेत.

Advertisement

या योजनेंतर्गत दरवर्षी राज्यभरातून 20 पात्र पाल्यांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य म्हणून 10 लाखांपर्यंतचे बिनव्याजी अग्रीम महामंडळाकडून देण्यात येणार आहे. यामध्ये कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ही रक्कम टप्प्याटप्प्याने परत घेण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी ही योजना अधिक सुलभ आणि परवडणारी ठरणार आहे.

30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करा

योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया लवकरच अधिकृत वेबसाईट किंवा संबंधित विभाग नियंत्रक कार्यालयामार्फत स्पष्ट केली जाणार आहे.

राज्यभरात सकारात्मक प्रतिसाद

महामंडळाचे मुख्य कामगार अधिकारी राज कोनवाडकर यांनी यासंदर्भातील सूचना सर्व विभाग नियंत्रकांना पाठवल्या आहेत. योजना सुरू होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला असून, अनेक कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

कल्याणकारी योजनांचा विस्तार

महामंडळाकडून कर्मचाऱ्यांसाठी यापूर्वीही अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात आल्या आहेत. आरोग्य विमा, मुलांच्या शैक्षणिक शुल्कासाठी अनुदान, निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन योजनाचा समावेश आहे. आता परदेशी शिक्षण अग्रीम योजना या यादीत एक मोठे पाऊल ठरणार आहे.

एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांना आवाहन

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. मुलांच्या भविष्यासाठी एक मजबूत पायाभरणी करावी. एसटीच्या नव्या पिढीचे भविष्य उज्ज्वल व्हावे, हे ध्येय आहे, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे. ही योजना केवळ आर्थिक मदत नसून, एका संधीचा दरवाजा आहे.

शिक्षणातून परिवर्तन घडवण्याची क्षमता असलेल्या या उपक्रमामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांचे आयुष्यच बदलून जाऊ शकते. त्यामुळे या योजनेचा लाभ घेऊन अनेक कर्मचाऱ्यांच्या घरात नवा प्रकाश येणार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज मागवून हा प्रस्ताव पाठवणार आहोत. तरी सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी अर्ज करावे.

- संदीप भोसले, कामगार अधिकारी, एसटी कोल्हापूर विभाग

Advertisement
Tags :

.