राज्य परिवहन महामंडळाच्या बसपास दरात वाढ
सामान्यांबरोबर ज्येष्ठ नागरिकांतूनही नाराजी
बेळगाव : नवीन वर्षात बसच्या तिकीट दरात वाढ झाल्यानंतर त्यापाठोपाठ आता राज्य रस्ते परिवहन महामंडळाने मासिक पासदरामध्ये सुधारणा केली आहे. बुधवारपासून मासिक पासदरात वाढ झाली आहे. प्रासंगिक करारावर देण्यात येणाऱ्या बसच्या भाडेदरामध्ये प्रतिकिलोमीटरला सामान्य वाहतूक, अश्वमेध, पल्लकी यासह सोळा विविध प्रकारच्या बसच्या भाडेदरात वाढ करण्यात आली आहे. ऐरावत, अंबारी यासह एसी बसेसना जीएसटी व टोलशुल्क समाविष्ट करून भाडेदरात सुधारणा करण्याचा आदेश बजावण्यात आला असून सुधारित दरानुसारच प्रवाशांना प्रवास करावा लागणार आहे. मेघदूत व विनाथांबा बसमधून सामान्य प्रवासासाठी मासिक बसपास दर हा किमान 70 रुपयांवरून 420 रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पासदर हा किमान 60 रुपयांवरून 380 पर्यंत वाढविण्यात आला आहे. सामान्य बसमधून मासिक पासदर हा किमान 60 वरून 270 रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पास दर हा पूर्वी 55 रुपये होता. आता त्यात वाढ करण्यात आली असून 245 रुपये आकारण्यात येत आहेत.
जलद आणि विनाथांबा बसमधून सामान्य प्रवाशांना मासिक पास दर हा किमान दर म्हणून 450 रुपये घेण्यात येत होता. यात आता सुधारणा करण्यात आली असून 520 रुपये आकारण्यात येत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना 405 ऐवजी 465 रुपये द्यावे लागणार आहेत. सामान्य बसमधून किमान दर हा सामान्य प्रवाशांसाठी 400 रुपये होता. आता त्यामध्ये सुधारणा करण्यात आल्यानंतर 460 रुपये द्यावे लागणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना 360 रुपयांऐवजी 455 रुपये मोजावे लागणार आहेत. जलद व विनाथांबा बसमधून किमान दर हा सामान्य प्रवाशांसाठी 2800 रुपये होता. यामध्ये सुधारणा करण्यात आल्याने 3 हजार 220 रुपये मोजावे लागणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना 2,520 रुपयांऐवजी 2 हजार 900 रुपये द्यावे लागणार आहेत. सामान्य बसमधून किमान दर हा सामान्य प्रवाशांसाठी 1800 रुपये होता. दरामध्ये सुधारणा केल्याने 2 हजार 070 रुपये मोजावे लागणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना मासिक बसपाससाठी 1620 रुपयांऐवजी 1865 मोजावे लागणार आहेत.
पूर्वीप्रमाणेच बसपासदर आकारण्याची मागणी
एकीकडे महिलांना मोफत प्रवास तर दुसरीकडे पुरुष प्रवाशांना सामान्य प्रवासासह मासिक बसपास दरात वाढ करण्यात आल्याने पुरुष प्रवाशांतून असंतोष व्यक्त होत आहे. परिवहन महामंडळाने यावर विचार करून किमान ज्येष्ठ नागरिकांसाठी बसपासदरात वाढ न करता पूर्वीप्रमाणेच आकारण्यात यावा, अशी मागणी आहे. बस तिकीट दरवाढीबाबत परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता डिझेलचे वाढते दर, त्याचबरोबर परिवहन कर्मचाऱ्यांना किमान वेतनवाढ यासारख्या समस्या महामंडळासमोर असल्याने तिकीट दरवाढ करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले.