For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गैरप्रकारांमुळे राज्यातील कारागृहे ठळक चर्चेत

11:56 AM Sep 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
गैरप्रकारांमुळे राज्यातील कारागृहे ठळक चर्चेत
Advertisement

कर्नाटकातील कारागृहांमध्ये घडलेल्या गैरप्रकारांसंबंधी एकूण पंधरा प्रकरणे दाखल

Advertisement

बेळगाव : बेळगावसह राज्यातील विविध कारागृहांमध्ये कैद्यांना सुख-सुविधा पुरविण्यात येत आहेत. अनेक गैरप्रकारांमुळे राज्यातील कारागृहे ठळक चर्चेत आली असून रेणुकास्वामी खून प्रकरणात तर सर्वोच्च न्यायालयाने कारागृह प्रशासनावर ताशेरे ओढले होते. उपलब्ध माहितीनुसार बेंगळूर येथील परप्पन अग्रहार, बेळगाव हिंडलगा मध्यवर्ती कारागृह, गुलबर्गा, बळ्ळारी, धारवाड, दावणगेरे आदी कारागृहांमध्ये घडलेल्या गैरप्रकारांसंबंधी एकूण पंधरा प्रकरणे दाखल झाली असून 30 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बेळगाव येथे तीन प्रकरणांमध्ये तीन कर्मचारी निलंबित झाले आहेत. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये झालेल्या कारवाईनंतर कारागृहात येणाऱ्या कैद्यांना नियमबाह्या सोयीसुविधा पुरविण्यात येतात. जेल मॅन्युएलमध्ये ज्याची तरतूद नाही त्या वस्तूही पुरवण्यात येतात. काहीवेळा आर्थिक हितसंबंधातून तर आणखी काहीवेळा कैद्यांकडून दिल्या जाणाऱ्या धमक्यांना घाबरून अधिकारी व कर्मचारी त्यांची बडदास्त ठेवतात.

कारागृह प्रशासनाकडे आधीच अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे साहजिकच आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो आहे. अशा परिस्थितीत कारागृहात येणारे अनेक गुंड सोयीसुविधा मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना धमकावतात. जर या धमकीला त्यांनी बळी पडले नाहीत तर त्यांच्यावर गंभीर आरोप केले जातात. अनेकवेळा आर्थिक व्यवहार करून कैदी सोयीसुविधा मिळवतात. रेणुकास्वामी खून प्रकरणात स्थानबद्धतेत असलेला चित्रपट अभिनेता दर्शन याची बेंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृहात कशी बडदास्त ठेवण्यात आली होती, याविषयीची छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर राज्यातील कारागृहात होणारे गैरप्रकार ठळकपणे चर्चेत आले.

Advertisement

राज्य सरकारने दर्शन व त्याच्या साथीदारांचा जामीन रद्द करावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावेळी कारागृहात दर्शनची बडदास्त ठेवणाऱ्या कारागृह प्रशासनाची कानउघाडणी करतानाच सर्वोच्च न्यायालयाने यापुढे असे प्रकार आढळून आले तर याद राखा, असा इशारा दिला होता. उपलब्ध माहितीनुसार राज्यात 54 कारागृहे आहेत. यामध्ये 14 हजार 481 कैदी आहेत. एका परप्पन अग्रहार कारागृहातच 5 हजारहून अधिक कैदी आहेत. अलीकडेच कारागृहात स्थानबद्धतेत असलेल्या दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून एक डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना अटक झाल्याचे उदाहरण आहे. कारागृहातील व्यवस्था सुधारण्याचे मोठे आव्हान कारागृह प्रशासनासमोर आहे. बेळगाव येथील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात तर कैदी व अधिकारी यांच्या संघर्षातून अनेक गुन्हेगारी प्रकरणेही दाखल झाली आहेत.

Advertisement
Tags :

.