भाजपकडून 2 राज्यांचे प्रदेशाध्यक्ष जाहीर
राजस्थानात मदन राठौड तर बिहारमध्ये दिलीप कुमारांना जबाबदारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजस्थान आणि बिहारसाठी भाजपने नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावांची घोषणा केली आहे. पक्षाने बिहार सरकारमध्ये मंत्री असलेले दिलीप कुमार जायसवाल यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. तर यापूर्वी ही जबाबदारी उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडे होती. तर राजस्थानात राज्यसभा खासदार मदन राठौड यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आहे. यापूर्वी लोकसभा खासदार सी.पी. जोशी हे राजस्थान भाजपचे अध्यक्ष होते. 24 जुलै रोजी जोशी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्यावर प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
याचबरोबर भाजपने 6 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रभारी बदलले आहेत. भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी सर्व नावांची घोषणा केली असून यासंबंधी भाजपकडून सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती देण्यात आली.
मदन राठौड हे 5 महिन्यांपूर्वीच राज्यसभा खासदार म्हणून निवडून आले आहेत. यापूर्वी ते सुमेरपूरचे दोनवेळा आमदार राहिले आहेत. पक्षसंघटनेत काम करण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे. मागील वर्षी झालेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत त्यांनी उमेदवारीची मागणी केली होती, परंतु पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नव्हती, त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. परंतु त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करून त्यांची समजूत काढली होती. काही महिन्यांनी त्यांना पक्षाने राज्यसभेवर पाठविले होते. तर आता प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मागास समुदायाच्या नेत्याला संधी
डॉ. दिलीप जायसवाल हे अतिमागास समुदायाशी संबंधित आहेत. पक्षाने सलग चौथ्यांदा मागास समुदायाच्या व्यक्तीकडे बिहार भाजपची धुरा सोपविली आहे. जायसवाल हे सध्या बिहारमध्sय महसूल तसेच भूमी सुधारणा मंत्री आहेत. सलग तीनवेळा ते विधान परिषदेचे सदस्य निवडून आले आहेत. तसेच ते सलग 21 वर्षांपासून बिहार भाजपचे खजिनदार आहेत.
अरविंद मेनन तामिळनाडू भाजपचे प्रभारी
भाजपने राज्यसभा खासदार डॉ. राधामोहन दास अग्रवाल यांना राजस्थान प्रभारी तर विजया रहाटकर यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर राष्ट्रीय सचिव अरविंद मेनन यांना तामिळनाडू भाजप प्रभारी तर सुधाकर रे•ाr यांना सहप्रभारी म्हणून नेमण्यात आले आहे. खासदार राजदीप रॉय यांची त्रिपुराचे प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. याचबरोबर माजी खासदार हरीश द्विवेदी यांना आसाम, अतुल गर्ग यांना चंदीगड तर अरविंद मेनन यांच्याकडे लक्षद्वीप पक्षप्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.