पक्ष प्रवेशाला प्रदेशाध्यक्ष : इशारा खासदारांना
सांगली / शिवराज काटकर :
सांगलीत काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज सरगर यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम ११ ऑगस्ट रोजी होणार असून या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी अनेक मोठे प्रवेश झाले. यावेळी प्रदेशाध्यक्षांची सांगलीत उपस्थिती हा खासदार विशाल पाटील यांना अप्रत्यक्ष "सोबत या, नाहीतर तुमची टीम पोखरू" असा इशारा मानला जात आहे.
सध्या काँग्रेस कार्यकर्ते नाराज असून भाजप व जनसुराज्यसारख्या पक्षांकडे वळत आहेत. मनोज सरगर यांच्या प्रवेशामुळे भाजपला सांगली शहरातील धनगर समाजाला संदेश देण्यासोबतच काँग्रेसच्या गोटात खळबळ उडवण्याचा प्रयत्न दिसतो. पण यात अनेकांची अनेक उद्दिष्टेही साध्य होत आहेत
- गाडगीळ आणखी भक्कम
आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासाठी हा प्रवेश गटबांधणी मजबूत करणारा ठरणार आहे. विशेष म्हणजे संजयनगर भाजप प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांचे प्रभावक्षेत्र आहे. तिथे गाडगीळ यांच्या ताब्यात सरगर यांच्यासारखा सक्षम नेतो मिळत आहे. सरगर यांनी विशाल पाटील यांच्या लोकसभेच्या प्रचारासाठी सांगलीसह जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, आटपाडी अशा भागांत चांगली फिल्डिंग लावली होती. त्यांच्या लोकसंपर्काचा फायदा झाला होता. निधी वाटपात भूमिका न मिळाल्याने ते नाराज होते आणि गाडगीळ यांनी संधी साधत त्यांना पक्षात आणले.
- फायद्या प्रमाणे तोटाही शक्य
हा प्रवेश प्रत्यक्षात भाजपच्या प्रदेश कार्यालय व मुख्यमंत्र्यांच्या राजकीय विभागाच्या योजनेचा भाग आहे. गाडगीळ यांनी या योजनेला गती देऊन मुख्यमंत्री इच्छित राजकारणाचा भाग बनत एक सक्षम घटक आपल्या गटात आणला. मात्र या फायद्याबरोबरच धोका असा की माजी सभापती धीरज सूर्यवंशी नाराज होऊन निष्क्रिय होऊ शकतात. काँग्रेस, विशेषतः खा. विशाल पाटील, सूर्यवंशींना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करू शकतात. पण, सूर्यवंशी परिवार ज्यात धीरज यांचे वडील आणि चुलते जो निर्णय घेतील त्यानुसार त्यांची पुढची वाटचाल ठरेल.
- पालकमंत्र्यावर 'मम' जबाबदारी
या सगळ्या हालचालींमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भूमिका 'मम' धोरणाची राहिली आहे. जयश्री पाटील यांचा प्रवेश मुख्यमंत्र्यांकडे ठरला. पालकमंत्री दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी किलोभर मिठाई घेऊन गेले. तेच अण्णा डांगे यांच्या प्रवेशानंतरही घडले. मुंबईतल्या प्रवेश कार्यक्रमात सूत्रसंचालकाची भूमिका त्यांनी पार पाडली. नुकतेच कुंडल येथील जी.डी. बापू लाड स्मारकाला भेट देऊन आले. शरद लाड हे यापुढील पदवीधर मतदारसंघातील डार्क हॉर्स आहेत. त्यांची जोरदार तयारी असल्याने मुख्यमंत्र्यांची त्यांच्यावर नजर आहे. शरद लाड यांच्या नावाची चर्चा असताना पालकमंत्री त्यांनाही भेटून आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश भाजपचे पदाधिकारी सांगलीतील प्रवेश घडामोडींवर स्वतःच लक्ष ठेवून आहेत. काही नेत्यांच्या मते कोणालाही न विचारता प्रवेश होत आहेत. तरीही मोठे नेते विरोध करत नाहीत. कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या घालायच्या का? असा प्रश्न पत्रकारांनी आमदार सुधीरदादांना विचारला होता. त्यावर "आता सतरंज्या घालायला लागत नाहीत. आम्ही सर्वांसाठीच खुर्च्छा लावलेल्या आहेत," असे विधान करत आमदार सुधीर गाडगीळ यांनी पक्षाची मानसिकता स्पष्ट केली. पृथ्वीराज पाटील यांचा प्रवेश पक्ष नेतृत्वाकडून झाल्यास स्वागत करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. या हालचालींमुळे भाजपमध्ये तसेच जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.