संभाजी ब्रिगेडचा उद्या वाशिममध्ये राज्यस्तरीय मेळावा
राज्यभरातून कार्यकर्ते उपस्थित राहणार : प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर करणार मार्गदर्शन
कोल्हापूर प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेडच्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (2 डिसेंबर) वाशिममध्ये राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन केले आहे. वाटाणे लॉन अकोला नाका येथे सकाळी 11 वाजता मेळाव्याला सुरूवात होणार आहे. राज्यभरातून मेळाव्यासाठी हजारो कार्यकर्ते वाशिममध्ये दाखल होणार आहेत. दरम्यान, राज्यातील राजकीय स्थिती, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या या मेळाव्यात चर्चा आणि काही महत्वाच्या घोषणाही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मेळाव्यात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे व महासचिव सौरभ खेडेकर मार्गदर्शन करणार आहेत. आरक्षण, शिक्षण, आरोग्य, नोकरभरती या महत्वाच्या मुद्द्यांबरोबरच शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, युवक-युवतींचे सक्षमीकरण या मुद्द्यांवरही चर्चा होणार आहे. त्याचबरोबर आगामी काळात राज्य सरकाराच्या धोरणाविरोधात संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत, त्या संदर्भातही या मेळाव्यात मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष निलेश सुतार यांनी दिली. या मेळाव्याला कोल्हापुरातूनही शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षण, छगन भुजबळ यांच्यावर चर्चा
या मेळाव्यात आमच्या हक्काचे मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भूमिका आणखीन तीव्र करण्याच्या दृष्टीने चर्चा आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचबरोबर तथाकथित ओबीसी नेते म्हणून घेणारे छगन भुजबळ सारखे लोक मराठा व ओबीसी वाद लावून महाराष्ट्रात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांचाही या मेळाव्यात संभाजी ब्रिगेड स्टाईलने समाचार घेण्यात येणार आहे, असेही जिल्हाध्यक्ष निलेश सुतार यांनी सांगितले.