राज्य विधिमंडळाचे अधिवेशन उद्यापासून
21 मार्चपर्यंत चालणार : 7 रोजी मुख्यमंत्री मांडणार राज्याचा अर्थसंकल्प
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 3 मार्चपासून सुरु होणार आहे. 21 मार्चपर्यंत अधिवेशन चालणार असून 7 रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे अर्थमंत्री या नात्याने 2025-26 या वर्षातील राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. मुख्यमंत्र्यांनी सर्व खात्यांची अर्थसंकल्पपूर्व बैठक घेतली असून अर्थसंकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 3 रोजी सकाळी 11 वाजता कामकाजाला प्रारंभ होईल. पहिल्या दिवशी राज्यपाल थावरचंद गेहलोत दोन्ही सभागृहांना उद्देशून भाषण करतील. मंगळवार 4 मार्च ते गुरुवार 6 मार्चपर्यंत राज्यपालांच्या भाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा होणार आहे. 7 मार्च रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे अर्थमंत्री या नात्याने 2025-26 या सालातील राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
21 मार्चपर्यंत अधिवेशन चालणार असून 10 मार्चपासून अर्थसंकल्पावर चर्चा होईल. अधिवेशनाच्या अखेरीस सरकार अर्थसंकल्पावर उत्तर देणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष यु. टी. खादर आणि विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी शुक्रवारी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेऊन अधिवेशनाचे निमंत्रण दिले होते.
शनिवारी याविषयी पत्रकार परिषदेत बोलताना सभापती होरट्टी म्हणाले, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल दोन्ही सभागृहांना संबोधून भाषण करतील. नंतर सभागृहांमध्ये अलीकडे निधन झालेल्या महनिय व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात येईल. सभागृहांमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा करावी, याविषयी कामकाज सल्ला समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.
विधिमंडळाच्या संयुक्त सल्लागार समितीची बैठक बोलविण्याची विनंती विधानसभेचे अध्यक्ष यु. टी. खादर आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना केली आहे. सोमवारी दुपारी 3 वाजता या समितीची बैठक घेतली जाईल.
4 रोजी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक
विधिमंडळाचे अधिवेशन 3 मार्चपासून सुरु होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 4 मार्च रोजी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सभागृहात करावयाच्या चर्चांवर आढावा घेतला जाणार आहे. 4 रोजी बेंगळूरमधील खासगी हॉटेलमध्ये सायंकाळी 6 वाजता ही बैठक होणार आहे. काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्वाखाली ही बैठक होणार आहे. बैठकीत सहभागी होण्यासंबंधी पक्षाचे सचिव अल्लमप्रभू पाटील यांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांना पत्र पाठविले आहे.