राज्य मानव हक्क आयोग अध्यक्षांची सिव्हिलला भेट
व्यवस्थेत सुधारणेसाठी केल्या विविध सूचना
बेळगाव : कर्नाटक राज्य मानव हक्क आयोगाचे अध्यक्ष टी.श्यामभट यांनी बुधवारी सिव्हिल हॉस्पिटलला अचानक भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. प्रसूती विभागात दाखल झालेल्या महिला व त्यांच्या कुटुंबीयांशीही चर्चा करून माहिती घेतली. बिम्स इस्पितळात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दलही श्यामभट यांनी माहिती जाणून घेतली. इस्पितळासाठी आवश्यक एमआयआर स्कॅनिंग यंत्रासाठी प्रस्ताव पाठवावा. नोंदणीसाठी असलेल्या काऊंटरची संख्या वाढवावी, पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, जन्मदाखले देण्यात विलंब होऊ नये, अशा सूचनाही अध्यक्षांनी केल्या. यावेळी आयोगाचे सदस्य एस. के. वंटगोडी यांनी इस्पितळात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी सूचना केली. यावेळी बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. इराण्णा पल्लेद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगदीश गाणिगा आदी उपस्थित होते.