For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यात १५ दिवस पुरेल इतका पेट्रोल साठा

01:01 PM Mar 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
राज्यात १५ दिवस पुरेल इतका पेट्रोल साठा
Advertisement

अफवांवर विश्वास नको, राज्यातील इंधन पुरवठा सुरळीत पेट्रोल डिलर्स संघटनेचे अध्यक्ष नरहर ठाकूर यांची माहिती

Advertisement

पणजी : इंधन संपण्याच्या भीतीमुळे लोकांमध्ये अजूनही घबराट आहे. आजदेखील लोकांनी पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी केल्यामुळे काही पंपांवरील पेट्रोल साठा संपला आणि ते बंद करावे लागले. लोकांनी घाईघाईने गर्दी करून पेट्रोल आणि डिझेलचा साठा केल्यामुळे पंप मालकांचे गणित कोलमडले आहे. दरम्यान, तेल वाहून नेणाऱ्या बोटी कालच मुरगाव बंदरात दाखल झाल्या असून गोव्यातील इंधन साठा आणखी 15 दिवसांनी वाढला आहे. येत्या आठ दिवसांत आणखी एक बोट येणार आहे. त्यामुळे लोकांनी चिंता करू नये आणि साठा करू नये, असे आवाहन गोवा पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष नरहर ठाकूर यांनी केले आहे.

अमेरिका-इस्राईल, इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केल्यामुळे सर्व लोक ‘पॅनिक मोड‘मध्ये गेले आहेत. काल रात्रीपासूनच लोकांनी पेट्रोल पंपांवर जाऊन पेट्रोल आणि डिझेलचा साठा करण्यास सुरुवात केली. एका पेट्रोल पंपावर सरासरी दिवसाला 9 हजार लिटर पेट्रोल आणि 3 हजार लिटर डिझेलची विक्री होत असे. मात्र काल या संख्येत मोठी वाढ होऊन लोकांनी साडेअकरा हजार लिटर पेट्रोल आणि साडेसहा हजार लिटर डिझेल विकत घेतले आहे. यामुळे पेट्रोल पंप मालकांचे संपूर्ण नियोजन कोलमडले आहे, असेही ठाकूर यांनी सांगितले.

Advertisement

माझ्याकडे आज सकाळी 6 हजार लिटर पेट्रोल होते आणि ते अवघ्या दोन तासांत संपले. आता माझा टँकर गेला असून तो दोन तासांत परत येईल आणि साठा भरला जाईल. लोकांनी काळजी करण्याची गरज नाही. झुवारी सांकवाळ येथील टाक्यांमध्ये मुबलक साठा उपलब्ध आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 8 दिवसांचा साठा असल्याचे जे सांगितले होते, ती बातमी खरी होती. काल मुरगाव बंदरात बोट आल्यानंतर आता राज्याकडे 15 दिवसांचा साठा उपलब्ध आहे. या बोटी दर आठ दिवसांनी येतात आणि इंधन भरतात, अशी माहिती नरहर ठाकूर यांनी दिली. इंधन पुरवठा सुरळीत आहे. काही पंपांवर पेट्रोल नसले तरी डिझेल उपलब्ध आहे. ज्या पंपांवरील पेट्रोल संपले आहे, तिथे टँकर आणून काही तासांत साठा भरला जाईल. लोकांनी विनाकारण घाबरून साठा करू नये, असे नरहर ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.

नागरी पुरवठा खात्याचे आवाहन

राज्यातील तेल टर्मिनलवर पेट्रोल, डिझेल तसेच एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असून, राज्यभरात पुरवठ्यात कोणताही व्यत्यय आलेला नाही. आरओ, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे, पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्धतेबाबत चिंता करण्याची गरज नाही आणि पुरवठा पूर्वीप्रमाणेच कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहील. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी पेट्रोल पंपांवर विनाकारण गर्दी करून अनावश्यक भीती आणि चिंता निर्माण करणे टाळावे, असे नागरी पुरवठा खात्याने कळविले आहे.

Advertisement
Tags :

.