शिक्षण-आरोग्य क्षेत्रावर राज्य सरकारचा भर
वैद्यकीय शिक्षणमंत्री शरणप्रकाश पाटील यांची पत्रकारांना माहिती
कारवार : राज्यातील काँग्रेस सरकारने शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रावर अधिक भर दिला आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री शरणप्रकाश पाटील यांनी दिली. ते येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील सभागृहात पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, राज्यातील गरीब जनतेला उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी दोन जिल्ह्यांकरीता एक सुपर स्पेशॅलिटी रुग्णालय सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. गरिबांसाठी रुग्णालये सुरू करणे ही आपली प्राधान्यता आहे, असे स्पष्ट करून पाटील पुढे म्हणाले, कॅन्सर, हार्टअटॅकसारख्या आजारांवर उपचार घेणे गरिबांना परवडत नाही. अशा गंभीर आजारांवरील उपचार खर्च गरिबांच्या आवाक्यापलीकडचा असतो. त्याकरीता गरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उत्तम उपचार करण्यासाठी सरकारने अनेक उपाय योजना हाती घेतल्या आहेत.
कारवार जिल्ह्यात सुपर स्पेशॅलिटी रुग्णालय सुरू करण्यासाठी वैद्यकीय मंत्री या नात्याने आपण निर्णय घेतला तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही. तसा निर्णय आपण घेणे शक्य नाही. त्याकरीता या जिल्ह्यात सुपर स्पेशॅलिटी रुग्णालय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करून रुग्णालयासाठी प्रामाणीक प्रयत्न करीन, असे सांगितले. कैगा अणुऊर्जा प्रकल्पामुळे होणाऱ्या रेडीएशन आणि दांडेली येथील वेस्टकोस्ट पेपरमीलमुळे होणाऱ्या पर्यावरण पोलुशनमुळे येथे कॅन्सर रुग्णालय सुरू करण्यात येत आहे काय? या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले, केवळ कारवारातच नव्हे तर राज्यातील म्हैसूर, तुमकूर, मंड्या, रायचूर आदी जिल्ह्यातही कॅन्सर रुग्णालय सुरू करण्यात येत आहे. ज्या-ज्या ठिकाणी सरकारकडून रुग्णालय सुरू करणे शक्य नाही अशा ठिकाणी पी.पी.पी. तत्त्वावर रुग्णालये सुरू करण्यात येतील. तथापि या रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांना सरकारी दरात उपचार करण्याची अट घालण्यात येईल.
रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात
येथील 450 बेड्सचे रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या अतिरीक्त खर्चाचा यंत्रसामग्रीचा आढावा घेण्यात आला आहे. तेथे डॉक्टरांची कमतरता असली तरी लवकरच हे रुग्णालय सुरू करण्यात येईल. यावेळी कारवार-अंकोलाचे आमदार सतीश सैल, मेडीकल कॉलेजच्या संचालिका डॉ. पौर्णिमा, काँग्रेस नेते साई गांवकर, शंभू शेट्टी आदी उपस्थित होते.