For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोबाईल चोरट्यांच्या पथ्यावर राज्योत्सव

07:54 AM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
मोबाईल चोरट्यांच्या पथ्यावर राज्योत्सव
Advertisement

168 हून अधिक मोबाईल चोरीला : वेगवेगळ्या स्थानकात फिर्याद

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

राज्योत्सव मिरवणुकीत दरवर्षीप्रमाणे यंदाही मोबाईल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. रविवारी रात्री 9 वाजेपर्यंत आपले मोबाईल चोरीस गेल्याच्या तक्रारी घेऊन सुमारे 168 हून अधिक जण पोलीस स्थानकात दाखल झाले होते. त्यानंतरही पोलिसांकडे येणाऱ्यांचा ओघ सुरूच होता. त्यामुळे हा आकडा दुप्पट होण्याची शक्यता आहे.

Advertisement

रविवारी 1 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार मार्केट पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 98, खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 65, एपीएमसी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 1 व कॅम्प पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 4 जणांचे मोबाईल चोरीस गेल्याच्या तक्रारी आल्या आहेत. खरेतर बहुतेक चोरीच्या घटना राणी चन्नम्मा चौक परिसरात घडल्या आहेत. मात्र, चोरीच्या तक्रारी घेऊन लोक वेगवेगळ्या पोलीस स्थानकांकडे जाताना दिसत होते.

गेल्या वर्षी 300 हून अधिक मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी आल्या होत्या. गेल्या वर्षी शनिवार दि. 1 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत 190 हून अधिक मोबाईल चोरीस गेले होते. यंदाही मोबाईल चोरांची टोळी बेळगावात दाखल झाली असून डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाईच्या खिशातून अलगदपणे मोबाईल पळविण्यात येत आहेत.

यापैकी ‘तरुण भारत’ने काही तरुणांशी संवाद साधला असता पँटच्या खिशात मोबाईल ठेवून आम्ही राज्योत्सव मिरवणुकीत नाचत होतो. नाचताना आपले मोबाईल चोरीस गेले आहेत. नाचणे बंद झाल्यानंतर चोरीचे प्रकार आमच्या लक्षात आले, असे या तरुणांनी सांगितले. चोरीच्या घटना लक्षात घेता मोबाईल चोरांची मोठी टोळीच बेळगावला आल्याचे दिसून येते.

यापूर्वीही बेळगाव शहर व जिल्ह्यात जत्रा, यात्रा, आठवडी बाजारात मोबाईल चोरी करण्यासाठी हावेरी जिल्ह्यातील हानगलची टोळी यायची. यंदाही याच टोळीतील गुन्हेगार बेळगावला आलेत का? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. चोरीनंतर या टोळीतील गुन्हेगार त्या शहरातून बाहेर पडतात. काही दिवसांनंतर चोरलेल्या मोबाईलची विक्री केली जाते. मोबाईल चोरीनंतर काही क्षणात तो स्वीचऑफ केला जातो. कारण, पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नये, यासाठी चोरटे मोबाईल स्वीचऑफ करतात. रविवारी राणी चन्नम्मा चौक परिसरात झालेल्या मोबाईल चोरीनंतर ते स्वीचऑफ झाल्याचे आढळून आले आहेत.

Advertisement
Tags :

.