राज्य ग्राहक आयोगाचे फिरते खंडपीठ सेवेत
ग्राहकांच्या तक्रारींचे होणार निवारण : बेंगळूरच्या वाऱ्या थांबणार असल्याने मोठा दिलासा
बेळगाव : अधिक दर, सेवेतील कमतरता, उत्पादनांचा दर्जा, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती किंवा विक्रेत्यांकडून होणाऱ्या अन्यायाबाबत ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्यात राज्य ग्राहक आयोग खंडपीठाचे कायमस्वरुपी फिरते खंडपीठ स्थापन झाल्याने या भागातील जनतेला मोठा फायदा झाल्याचे ग्राहक व्यवहार कायदा मापनशास्त्र मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी सांगितले. कर्नाटक राज्य ग्राहक आयोग बेंगळूर, आहार व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक आयोग, ग्राहक व्यवहार कायदा मापनशास्त्र बेंगळूर, जिल्हा प्रशासन, जिल्हा वकील संघ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ऑटोनगर येथील कर्नाटक राज्य सहकारी शहर बँक महामंडळ येथे बुधवार दि. 5 रोजी राज्य ग्राहक आयोग खंडपीठाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी उद्घाटन समारंभात मंत्री के. एच. मुनियप्पा बोलत होते. दरवेळी ग्राहकांना न्यायासाठी बेंगळूरला जावे लागत होते. जिल्ह्यातील प्रलंबित ग्राहक प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी स्वतंत्र फिरते खंडपीठ आवश्यक होते. त्यानुसार कमी खर्चात प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी ग्राहक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. यासंदर्भात कर्नाटक राज्य ग्राहक आयोग निवारण कायमस्वरुपी खंडपीठ ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत काम करेल, असे ते म्हणाले.
राज्य ग्राहक आयोग खंडपीठ ग्राहकांच्या हक्कांसाठी काम करणार आहे. या खंडपीठाची उत्तर कर्नाटकाला आवश्यकता होती. मुख्यमंत्री व जिल्हा पालकमंत्र्यांच्या सततच्या प्रयत्नांतून या खंडपीठाचे उद्घाटन होत आहे. ग्राहक आयोगाने प्रभावीपणे काम केले पाहिजे. ग्राहकांची प्रकरणे जास्त दिवस प्रलंबित न ठेवता त्वरित निकाली निघतील याची काळजी घ्यावी, असेही मंत्री मुनियप्पा म्हणाले. बेळगाव जिल्ह्यात दोन हजारहून अधिक ग्राहक प्रकरणे प्रलंबित आहेत. भविष्यात ही प्रकरणे प्रलंबित राहू नयेत, यासाठी त्वरित तोडगा काढावा. ग्राहकांची समस्या लवकर सोडविण्यासाठी काही सुधारणा झाल्या पाहिजेत. खंडपीठाने ग्राहकांना त्यांच्या हक्कानुसार सेवा दिली पाहिजे. कोणतीही प्रकरणे प्रलंबित राहू नयेत, लोकाभिमुख, लोकोपयोगी खंडपीठ म्हणून काम करावे, असे कायदा व संसदीय व्यवहार मंत्री एच. के. पाटील म्हणाले.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून खंडपीठासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे ग्राहक आयोग खंडपीठ सुरू होण्यास विलंब झाला. मात्र, प्रत्यक्षात खंडपीठाला सुरुवात झाली असून आवश्यक साहित्य, कर्मचाऱ्यांची भरती व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. कायमस्वरुपी फिरत्या खंडपीठाचे लोकार्पण झाल्याने ग्राहकांसाठी ही बाब आनंदाची आहे. गेल्या चार वर्षांपासून खंडपीठासाठी संघर्ष सुरू होता. बेंगळूरच्या धर्तीवर बेळगाव जिल्हादेखील मोठा आहे. आगामी काळात या भागाच्या अधिक विकासासाठी शासन अनेक सवलती देणार असल्याचेही पालकमंत्री जारकीहोळी यांनी सांगितले. जिल्ह्यात चार वर्षांपूर्वी कायमस्वरुपी फिरते खंडपीठ स्थापन व्हायला हवे होते. मात्र, वकिलांनी सरकारवर सातत्याने दबाव घातल्याने अखेर खंडपीठ सुरू झाले आहे.
खासदार जगदीश शेट्टर म्हणाले, फिरत्या ग्राहक आयोग खंडपीठावर न्यायाधीश नियुक्त केले तरच योग्य होईल. ग्राहकांची प्रकरणे प्रलंबित राहू नयेत, ग्राहकांना लवकरात लवकर न्याय मिळावा, अनेक प्रकरणे दहा वर्षांपासून प्रलंबित आहेत. न्यायालयात लवकर प्रकरणे निकाली काढून फसवणूक झालेल्या ग्राहकांना न्याय मिळवून द्यावा, असे ते म्हणाले. यावेळी विधान परिषद सदस्य हणमंत निराणी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोगाचे अध्यक्ष संजीव कुलकर्णी, बेळगाव जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोगाचे (अतिरिक्त खंडपीठ) अध्यक्ष महांतेश शिग्वी, बेंगळूर कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या सदस्या सुनीता बागेवाडी, बेंगळूर कर्नाटक राज्य ग्राहक वाद निवारण आयोगाचे निबंधक आणि प्रशासक मल्लिकार्जुन कमतगी, बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. शिवाप्पा किवडसण्णावर आणि बार असोसिएशनचे पदाधिकारी व वकील उपस्थित होते.