राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर
रमेश तवडकर, दिगंबर कामत, मायकल लोबोंना संधी
पणजी : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणखी कोणत्या दोन ते तीन मंत्र्यांना वगळायचे, यावरून लांबलेला आहेच, त्याचबरोबर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड जाहीर होईपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार प्रलंबित राहणार आहे. नवी दिल्लीला गेलेले कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांना मुख्यमंत्र्यांकडून आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडून मिळालेल्या आश्वासनामुळे आता त्यांच्या वर्णिवर शिक्कामोर्तब झालेले आहे. आमदार गोविंद गावडे यांना मंत्रीपदावरून हटविल्यानंतर आता त्या रिक्त जागी सभापती रमेश तवडकर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सभापतींना तशी मुख्यमंत्र्यांकडून काही दिवसांपूर्वी सूचना मिळालेली आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळाची फेररचना करताना आणखी दोन किंवा तीन मंत्र्यांना वगळून नव्यांची नियुक्ती करावयाची आहे. रमेश तवडकर, दिगंबर कामत व मायकल लोबो यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे.
भाजप राष्ट्रीय अध्यक्षांची निवड
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड येत्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. येत्या 22 जुलैपासून संसदेचे अधिवेशन सुरू होणार असून तत्पूर्वी भाजपाध्यक्षाची निवड केली जाणार आहे. आतापर्यंत 12 राज्यांतील भाजप प्रदेशाध्यक्षांची निवड झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीनंतर गोव्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग खुला होणार आहे.
अमित शहांबरोबर चर्चा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर आमदार मायकल लोबो यांच्या समवेत रात्री उशिरा गोवा गाठले. विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे आपण काही गोष्टींवर केलेल्या चर्चेची माहिती दिली. मात्र मंत्रिमंडळाच्या फेर रचनेबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. राज्य विधानसभेचे अधिवेशन हे जरी तीन आठवड्यांचे असले तरी ते ऑगस्टमध्ये संपणार आहे. त्यामुळे एवढे दिवस उशीर करणे हे परवडणारे नाही. अनेक महामंडळांची पुनर्रचना देखील करावयाची आहे आणि त्या अनुषंगाने आषाढी एकादशी झाल्यानंतर लागलीच मुख्यमंत्री निर्णय घेतील. आणखी दोघा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळायचे आहे. त्याचबरोबर सभापतीपद देखील रिक्त होईल, त्यासाठी मंत्री सुभाष फळदेसाई यांचे नाव पुढे आले आहे. तसे झाल्यास आणखी एक मंत्रीपद रिक्त होऊ शकते. मंत्रिमंडळाची फेररचना झाल्यानंतर सर्वच मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील बरेच मोठे बदल होतील.