राज्याचा अर्थसंकल्प 7 मार्चला
मुख्यमंत्री सिद्धरामय्या : 3 पासून विधिमंडळाचे अधिवेशन
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटक विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होणार असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या 7 मार्च रोजी 2025-26 या सालातील राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. सिद्धरामय्या मांडत असलेल्या हा 16 वा अर्थसंकल्प आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून भाषण करतील. 4, 5 आणि 6 मार्च रोजी राज्यपालांच्या भाषणावर चर्चा होईल. शुक्रवार दि. 7 मार्च रोजी 2025-26 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प मांडण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. 10 मार्चपासून अर्थसंकल्पावर चर्चा होणार असून मार्च अखेरीस अर्थसंकल्पावर उत्तर देईन. अधिवेशन किती तारखेपर्यंत घ्यावे, याविषयी व्यवहार सल्लागार समिती निर्णय घेईल, असेही सिद्धरामय्या यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी शेतकरी नेते व शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींशी अर्थसंकल्पपूर्व बैठक घेतली. गुडघादुखीचा त्रास असून देखील मुख्यमंत्र्यांनी दिवसभर आपल्या शासकीय निवासस्थानी विविध खात्यांशी संबंधित अर्थसंकल्पपूर्व बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, मोठ्या संख्येने आलेल्या शेतकरी नेत्यांनी त्यांची मते मांडली आहेत. या मुद्द्यांचा विचार करून अर्थसंकल्प तयार करण्यात येईल. शेतकऱ्यांचे हित जोपाण्यासाठी व कृषी क्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकार कधीही मागे राहिलेले नाही, असे त्यांनी सांगितले. महागाई वाढल्याने अपेक्षा देखील वाढल्या आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर सिद्धरामय्या म्हणाले, केंद्र सरकार दरवाढ करत आहे तर राज्य सरकार महागाई रोखण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.
योजना रद्द करण्याचा प्रश्नच नाही!
अन्नभाग्य योजनेतील लाभार्थ्यांची रक्कम पाच महिन्यांपासून आणि गृहलक्ष्मी योजनेतील लाभार्थ्यांची रक्कम तीन महिन्यांपासून जमा झालेली नाही, असा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना सिद्धरामय्या म्हणाले, कोणत्याही योजना स्थगित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसतील तर आम्ही जमा करू, असेही त्यांनी सांगितले.