राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्चला
अर्थसंकल्पीय अधिवेशन 6 ते 27 मार्चपर्यंत : 14 दिवस चालणार कामकाज
प्रतिनिधी/ बेंगळूर
मुख्यमंत्रिपदावरून सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात संघर्ष सुरू असतानाच 2026-27 सालातील राज्य अर्थसंकल्पासाठी मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. अर्थखात्याची धुरा सांभाळणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे 6 मार्च रोजी सकाळी 10:15 वाजता अर्थसंकल्प सादर करतील. त्यांचा हा वैयक्तिकपणे मांडण्यात येणारा विक्रमी 17 वा अर्थसंकल्प असेल. विधानसभेच्या सचिव एम. के. विशालाक्षी यांनी सोमवारी यासंदर्भात अधिकृत पत्रक जारी केले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन 6 ते 27 मार्च या कालावधीत चालणार असून 14 दिवस कामकाज चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सिद्धरामय्या हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मागील आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी विविध खात्यांच्या अर्थसंकल्पपूर्व बैठका घेतल्या होत्या. आता ते 2026-27 सालातील अर्थसंकल्प मांडण्याच्या तयारीत गुंतले आहेत. अर्थखात्याचा पदभारही त्यांच्यावर आहे. अर्थमंत्री या नात्याने ते 6 मार्च रोजी मांडणारा अर्थसंकल्प हा त्यांचा 17 वा अर्थसंकल्प असेल. राज्यात सर्वाधिक अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम सिद्धरामय्यांच्या नावावर होईल.
राज्य सरकारने केंद्र सरकारच्या व्हीबी-जी राम जी कायद्याविरुद्ध ठराव मांडण्यासाठी आणि महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना मूळ स्वरुपात पुन्हा जारी करण्याची मागणी करण्यासाठी 22 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत विशेष अधिवेशन घेण्यात आले होते. त्यानंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आले होते. आता त्यापुढील सत्र शुक्रवार 6 मार्चपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
नव्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात अधिक अनुदान देण्याची मागणी विविध खात्यांच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली आहे. दुसरीकडे पाच गॅरंटी योजनांसाठी संसाधने गोळा करण्याचे आव्हानही राज्य सरकारसमोर आहे. मागील वेळी 4,09,549 कोटी रुपये इतक्या आकाराचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. यंदा त्यात किती भर पडेल, याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.