स्टेट बँकेने येस बँकेमधील हिस्सेदारी विकली
13 टक्के हिस्सेदारीची विक्री : 8 हजार कोटींमध्ये झाला व्यवहार
वृत्तसंस्था/मुंबई
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपली येस बँकमधील 13.18 टक्के इतकी हिस्सेदारी जपानच्या सुमीतोमो मित्सुई बँकींग कार्पोरेशन (एसएमबीसी)यांना विकली आहे. सदरचा हिस्सेदारी विक्रीचा व्यवहार 8 हजार 889 कोटी रुपयांना झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या करारांतर्गत येस बँकेचे 4.13 अब्ज समभाग 21.50 रुपये प्रतिसमभाग या किंमतीने हस्तांतरीत करण्यात आले आहेत. या विक्री कराराला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी 22 ऑगस्ट रोजी आणि कॉन्पिटीशन कमिशन ऑफ इंडिया (भारतीय स्पर्धात्मक आयोग) यांनी 2 सप्टेंबर रोजी मंजुरी दिली होती. एसबीआयच्या कार्यकारी मंडळाने हिस्सेदारी विक्रीसाठी 9 मे रोजीच्या बैठकीमध्ये मंजुरी दिली होती.
इतकी राहिली हिस्सेदारी
या विक्रीनंतर एसबीआयची येस बँकेमध्ये हिस्सेदारी कमी होऊन 10.8 टक्के इतकी राहिली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला एसएमबीसी यांनी येस बँकेमध्ये 20 टक्के हिस्सेदारी 13483 कोटी रुपयांना खरेदी केली होती. भारतीय बँकींग क्षेत्रामध्ये एखाद्या विदेशी संस्थेच्या गुंतवणुकीचा विचार करता सर्वात मोठा करार मानला जात आहे.