अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा
आटपाडी :
फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी विचार घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी पक्षाने राज्याच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. शब्दाला पक्के व जनतेच्या पाठीशी ठाम राहणारे अजितदादा पवार यांना भविष्यात मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
आटपाडी येथे युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित युवक संवाद मेळाव्यात मुश्रीफ बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, विलासराव जगताप, प्रताप पाटील, तमण्णगौडा रविपाटील, पंकज दबडे, निलेश येसुगडे, साधनाताई कांबळे, संदीप ठोंबरे, अरूण भोसले, सचिन पाटील, दादासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुश्रीफ म्हणाले, आटपाडीतील युवक संवाद मेळाव्यात चैतन्याने फुललेली युवाशक्ती स्फुर्तीदायी ठरली आहे. याच उत्साहाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात अव्वल राहिल. भोसले यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादीचे संघटन मोठे केले आहे. जिल्हा परिषद, महापालिकेवर राष्ट्रवादीचा निश्चितच झेंडा फडकेल.
ते म्हणाले, युतीमध्ये जनतेच्या हितासाठी पुरोगामी विचाराने अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली गतीमान काम सुरू आहे. निशिकांत भोसले यांनी अजितदादांना मुख्यमंत्री करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी सर्वांनी आत्तापासून राष्ट्रवादीला बळकट करावे. येणाऱ्या कालावधीत जिल्ह्यातील एकही रूग्ण उपचारासाठी मुंबईला जाणार नाही, इतकी वैद्यकीय सेवा जिल्ह्यात सक्षम करू, अशी ग्वाहीही मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
आटपाडी नगरपंचायतचा प्रारूप विकास आराखडा रद्द करण्यासाठी व डाळिंब प्रक्रिया उद्योगासाठी युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनिलशेठ पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार अजितदादांची भेट घेवुन प्रयत्न करू, असे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले. अनिलशेठ यांच्यासारख्या नेतृत्त्वामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी अव्वल राहिल, असा विश्वास व्यक्त करत संपर्कमंत्री म्हणुन निशिकांतदादांच्या कामाचाही आपल्याला अभिमान असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले यांनी युवकचा जिल्हाध्यक्ष कसा असावा हे अनिलशेठ पाटील यांच्यामुळे स्पष्ट झाल्याचे सांगत 2029ला राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांच्यासोबत असेल तोच या मतदारसंघात आमदार होईल, असा विश्वास व्यक्त केला. राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली विकास आराखडा रद्द करण्यासाठी झालेला लढा कौतुकास्पद असुन निवडणुक डोळ्यासमोर ठेवुन आराखड्याला फक्त स्थगिती मिळाली आहे. त्यासाठीचा लढा तीव्र करा, असे आवाहनही निशिकांत भोसले यांनी केले.
माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनिलशेठ पाटील यांच्या नेतृत्त्वाचे कौतुक करत आगामी नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती राष्ट्रवादी स्वतंत्र लढेल असे स्पष्ट केले.
युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी गत दहा वर्षात मोठ्या संघर्षातून वाटचाल करत असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. निशिकांतदादा पाठीशी असल्याने मी निर्धाराने काम करत आहेत. युवाशक्ती माझ्यासोबत असुन आगामी 2029चा खानापुर विधानसभा मतदारसंघाचा आमदार राष्ट्रवादीला विचारात घेवुनच होईल. गलाई व्यावसायिकांचे प्रश्न व डाळिंब प्रक्रिया उद्योगाचा प्रश्न अजितदादा व मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोडवावा अशी मागणी त्यांनी केली.
- प्रसंगी स्वतंत्र लढणार
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आगामी निवडणुका युतीव्दारे लढण्याचे स्पष्ट केले आहे. जेथे शक्य आहे तेथे युती होईल. व शक्य नाही तेथे स्वबळावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीने लढेल, असे सांगत मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगली जिल्हा निशिकांत भोसले यांच्यासह नेत्यांच्या भक्कम फळीमुळे राज्यात अव्वल राहिल, असा विश्वासही व्यक्त केला.