बेळगाव-गोवा रस्त्यांच्या कामाला सुरुवात करा
खासदार जगदीश शेट्टर यांचा राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना आदेश
बेळगाव : बेळगाव व गोवा राज्यामध्ये व्यापार-उद्योग व पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात दळणवळण होते. बेळगावच्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गोवेकर खरेदीसाठी येतात. परंतु, बेळगाव व गोवा जोडणारे दोन्हीही महामार्ग खराब झाले आहेत. त्यामुळे तातडीने बेळगाव-गोवा व्हाया अनमोड व बेळगाव-चोर्ला-गोवा या दोन्ही रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्याची सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना दिली.
महामार्गांचे काम रखडल्याने खासदार शेट्टर यांनी बैठक घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. दोन्ही महामार्गांच्या कामांसाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली. निधीही उपलब्ध करून दिला. परंतु, अद्याप काम पूर्ण न झाल्याने शेट्टर यांनी नाराजी व्यक्त करत कारणे जाणून घेतली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या धारवाड कार्यालयातील अधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे केंद्रीय अधिकारी उपस्थित होते.
बेळगाव-गोवा महामार्ग सुस्थितीत करावा, अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्ससह इतर औद्योगिक संघटनांनी लोकप्रतिनिधींकडे केली होती. मंजुरी मिळून देखील महामार्गाचे काम रोखण्यात आल्याने व्यवसाय-उद्योगांवर मोठा परिणाम होत असल्याने तांत्रिक त्रुटी दूर करत कामाला सुरुवात करण्याच्या सूचना खासदारांनी दिल्या. त्याचबरोबर शगनमट्टी (ता. बेळगाव) ते रायचूर मार्गे हुनगुंद या महामार्गाच्या कामाबाबतही खासदारांनी माहिती जाणून घेतली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी भुवनेश्वर कुमार, पवन, भूसंपादन अधिकारी राजश्री जैनापुरे यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.