रेशनकार्ड अर्ज भरणी प्रक्रियेला प्रारंभ
अन्न-नागरी पुरवठा खात्याची माहिती : ऑनलाईन प्रक्रिया, लाभार्थ्यांना दिलासा, मात्र रेशनकार्ड वितरण प्रक्रिया ठप्पच
बेळगाव : मागील काही महिन्यांपासून ठप्प झालेल्या नवीन रेशनकार्ड अर्ज भरणी प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे अर्जदार लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दोन तीन दिवसांपासून ऑनलाईन अर्ज भरणीला प्रारंभ झाला आहे. बेळगाव वन, ग्राम वन, कर्नाटक वनमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा खात्याने दिली आहे. मागील कित्येक महिन्यांपासून नवीन रेशनकार्ड वितरण आणि अर्ज भरणी प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यामुळे अनेक गोरगरिबांना शासकीय सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. विशेषत: गॅरंटी योजनांना मुकावे लागले आहे. त्यामुळे नवीन रेशनकार्ड वितरण प्रक्रियेला प्रारंभ करावा, अशी मागणी जोर धरून आहे. सध्या रेशनकार्डसाठी अर्ज स्वीकृती (भरणी) प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र अद्याप रेशनकार्ड वितरण प्रक्रिया ठप्प आहे. त्यामुळे यापूर्वी नवीन रेशनकार्डसाठी अर्ज केलेल्यांना अद्याप प्रतीक्षाच करावी लागणार आहे. मागील कित्येक महिन्यांपासून रेशनकार्ड प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. रेशनकार्ड वितरण आणि अर्ज भरणीचे कामही ठप्प होते. त्यामुळे अनेकांना शासकीय योजनांपासून दूर रहावे लागले आहे. शिवाय अनेकांना शैक्षणिक आणि इतर कामात अडचणी येत आहेत. नवीन रेशनकार्डच्या कामाला चालना द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. दरम्यान, अन्न व नागरी पुरवठा मंत्री मुनियप्पा यांनी लवकरच रेशनकार्डला चालना मिळेल, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप नवीन रेशनकार्ड वितरण प्रक्रियेला चालना देण्यात आली नाही. केवळ अर्ज भरणी प्रक्रिया सुरू आहे.
आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला आवश्यक
रेशनकार्ड अर्ज भरणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. नवीन एपीएल आणि बीपीएल रेशनकार्डसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. यासाठी आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. संबंधितांनी बेळगाव वन, कर्नाटक वन किंवा ग्राम वनमध्ये रेशनकार्डसाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.