केपीआयडी न्यायालय तातडीने सुरू करा
अहिंद वकील संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
बेळगाव : बेळगाव येथे ग्राहक न्यायालयाच्या कायमस्वरुपी पिठाला मंजुरी मिळूनही त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. यासाठी चार वर्षे आंदोलन करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सदर पिठासाठी त्वरित इमारत उपलब्ध करून देण्यात यावी. याचबरोबर केपीआयडी न्यायालयाचीही स्थापना करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन अहिंद अॅडव्होकेट संघटनेतर्फे अॅड. एन. आर. लातूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी बेळगाव येथे कायमस्वरुपी न्यायालय स्थापन करण्यासाठी चार वर्षांपासून आंदोलन करण्यात येत आहे. यावरून न्यायालय स्थापन करण्यासाठी शिफारस केली आहे. इमारतही मंजूर केली आहे. मात्र अद्यापही न्यायालयाचे कामकाज सुरू केले नाही. सदर न्यायालयाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, असे सांगितले. शहरासह जिल्ह्यातील अनेक नागरिक खासगी सहकारी संस्थांमध्ये ठेव ठेवत आहेत. काही सहकारी संस्थांकडून ठेवीदारांची फसवणूक करण्यात येत आहे. असाच प्रकार घडलेल्या एका सोसायटीच्या ठेवीदारांना न्यायासाठी बेंगळूरला धाव घ्यावी लागली आहे. केपीआयडी न्यायालयात कागदोपत्रे जमा करावी लागत आहेत. त्यामुळे गोरगरीब नागरिकांसह महिला, दिव्यांग, वयोवृद्ध नागरिकांची फरफट होत आहे. यासाठी अशा प्रकारचे खटले निकालात काढण्यासाठी केपीआयडी न्यायालय बेळगावमध्ये सुरू करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी अॅड. व्ही. एस. पाटील यांच्यासह इतर सहकारी वकील उपस्थित होते.