खडेबाजार रोडवरील सीडीवर्कचे काम त्वरित सुरू करा
व्यापाऱ्यांची नगरसेवकांकडे मागणी
बेळगाव : एलअॅण्डटीकडून 24 तास पाणी योजनेसाठी मुख्य बाजारपेठ असलेल्या खडेबाजार रोडवर खोदकाम करून जलवाहिनी घातली जात आहे. सदर काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने याचा मनस्ताप व्यापाऱ्यांना सहन करावा लागत असून धुळीचे साम्राज्य पसरले आहे. कार्लेकर सायकल दुकानासमोरील सीडी पूर्णपणे ब्लॉक झाली असल्याने पावसाळ्यात पाणी वाहून जाणे अवघड झाले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी आजूबाजूच्या दुकानात शिरत आहे. अशा तक्रारी व्यापाऱ्यांनी मांडल्यानंतर नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती यांनी नवीन सीडीवर्क करण्यासह जलवाहिनी घालण्याचे काम लवकर पूर्ण केले जाईल, असे आश्वासन दिले.
खडेबाजार रोडवरील विविध समस्यांबाबत शुक्रवारी तेथील व्यापाऱ्यांनी नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती यांना पाचारण करून माहिती दिली. एलअॅण्डटीकडून जलवाहिनी घालण्यासाठी खोदकाम केले जात आहे. तातडीने हे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. पण बाजारपेठेतील काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. धुळीचे लोळ दुकानात शिरत असल्याने व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मण्णूरकर गल्लीतून येणाऱ्या पावसाच्या पाण्यासाठी खडेबाजार रोडपर्यंत गटार बांधण्यात आली आहे. सदर पाणी यापूर्वी सीडीच्या माध्यमातून पलिकडच्या बाजूला जात होते. पण सीडी पूर्णपणे ब्लॉक झाली असल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे.
त्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी दुकानांमध्ये शिरत आहे. दरवर्षी पावसाळ्यात खडेबाजार रोडवरील व्यापाऱ्यांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे सीडीवर्कचे काम करून द्यावे, अशी मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी केली. त्यानंतर तातडीने नवीन सीडीवर्कचे काम करून देऊ तसेच पाईपलाईन घालण्याचे कामही लवकरात लवकरच पूर्ण करण्याची सूचना करू, असे आश्वासन नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती यांनी यावेळी दिले. यावेळी सतीश तेंडोलकर यांच्यासह खडेबाजार रोडवरील व्यापारी उपस्थित होते.