कोयनानगरमार्गे पाटण-मुंबई एसटी सुरू करा
कोयनानगर :
नुकत्याच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून पाटण आगारासाठी नव्या पाच एसटी बसेस मिळाल्या आहेत. कोयना विभागातील चाकरमानी मुंबईमध्ये मोठ्या संख्येने असल्याने ते नेहमी ये-जा करत असतात. कोयनामार्गे मुंबईला जाणारी एकही एसटी बस नसल्याने महिला एसटी महामंडळाच्या सवलतींपासून वंचित राहतात. त्यामुळे कोयनामार्गे पाटण- मुंबई एसटी बससेवा सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पूर्वी पाटण आगारातून कोयनानगर मार्गे पाटण ते मुंबई व सणबूर ते मुंबई अशा बससेवा सुरू होत्या. सकाळी दहा व आठ वाजता या बस कोयनानगर बसस्थानकातून सुटायच्या.
या परिसरातील अनेक तरुण कुटुंबासमवेत मुंबईला स्थलांतरित झाले आहेत. घरेदारे या ठिकाणी व कामाधंद्यासाठी मुंबईला असल्याने या विभागातून चाकरमानी नेहमी ये-जा करत असतात. कोयनानगर येथून मुंबईला एकही बस नसल्याने येथील जनतेला खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.
या परिसरातील महिलाही मुंबईला वास्तव्यास असल्याने त्यांना गावी येताना व मुंबईला जाताना खासगी वाहनाने ये-जा करावी लागते. त्यामुळे या महिला एसटी महामंडळाच्या सवालतींपासून वंचित रहात आहेत. कोयना मार्गे पाटण आगारातून पूर्वीप्रमाणे पाटण-मुंबई अशी सकाळी व रात्री बससेवा सुरू केल्यास या विभागातील ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटाचा, ७५ वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवासाचा व महिलांना अर्ध्या तिकिटाचा लाभ घेता येईल.
आतापर्यंत पाटण आगारातून एसटी बस कमी असल्याने नवीन बस पाठवता येत नसल्याचे सांगितले जात होते. मात्र पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून पाटण आगारासाठी पाच नव्या गाड्या देण्यात आल्या आहेत. यामुळे पूर्वीप्रमाणे कोयनानगर मार्गे पाटण-मुंबई एसटी बस सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बससेवा सुरू झाल्यास खासगी प्रवासातून होणारी आर्थिक लूट थांबेल व एसटी महामंडळालाही फायदा होईल. पाटण आगारातील अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केल्यास कोयना विभागातील चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित व सुखकर होईल, असे मत कोयना भागातील महिलांसह चाकरमानी व्यक्त करत आहेत.