For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पावसाळ्याच्या तोंडावर गाळ काढण्याच्या कामाला प्रारंभ

10:32 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
पावसाळ्याच्या तोंडावर गाळ काढण्याच्या कामाला प्रारंभ
Advertisement

शहापूर तलावाच्या कामाला विलंब लागल्याने संताप

Advertisement

बेळगाव : वडगाव-यरमाळ रस्त्यावरील शहापूर शिवाराच्या तलावातील गाळ काढण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. मात्र, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हाती घेण्यात आलेल्या या कामामुळे ते पूर्ण होईल की नाही? अशी शंका शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. मागील वर्षीही पावसाळ्याच्या तोंडावरच गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे हे काम अर्धवट राहिले होते. परंतु, यावर्षीही पावसाळ्याच्या तोंडावरच काम सुरू केल्याने प्रशासनाला नेहमी उशिराच का जाग येते? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. शहापूर, वडगाव, धामणे व येळ्ळूर शिवारातील शेतकऱ्यांसाठी तलावाचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु, नैसर्गिक पाण्याचा स्रोत नसल्याने दरवर्षी डिसेंबरमध्येच या तळ्याचे पाणी आटते. काही वर्षांपूर्वी माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या प्रयत्नातून गाळ काढण्याचे काम झाले होते. त्यानंतर कोणत्याही लोकप्रतिनिधीने तलावातील गाळ काढण्याकडे लक्ष दिले नाही. तलावाची खोली वाढविल्यास आसपासच्या शेतकऱ्यांना उन्हाळी पिके घेणेही शक्य होऊ शकते. यामुळे वारंवार शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते.

शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत मागील वर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली. अंदाजे दीड ते दोन कोटी रुपये या संपूर्ण कामासाठी मंजूर झाल्याची माहिती मिळाली आहे. मागील वर्षी गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. परंतु, त्यापूर्वी जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने हे काम थांबविण्यात आले. त्यानंतर या कामाला सुरुवात झाली नाही. जानेवारी महिन्यातच शहापूर तलावातील पाणी आटले. वास्तविक पाहता त्याचवेळी गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करणे गरजेचे होते. परंतु, गुरुवारपासून गाळ काढण्याच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे काही वेळा काम थांबवावे लागत आहे. गाळ काढायचाच होता तर पावसाळ्यापूर्वी का काढला नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.