For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑनलाईन सेवा सुरू; मात्र समस्यांनी जनता त्रस्त

11:09 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑनलाईन सेवा सुरू  मात्र समस्यांनी जनता त्रस्त
Advertisement

सुरळीत कामकाज कधी? मनपाच्या कारभाराबद्दल नाराजी

Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेने घरपट्टी भरण्यासाठी चलन देण्यास सुरुवात केली. सोमवारी सायंकाळपासून ऑनलाईन घरपट्टी भरण्यासाठी सुविधा उपलब्ध केल्याचे सांगण्यात आले. मात्र ऑनलाईनद्वारे घरपट्टी भरणे अवघड झाले आहे. पीआयडी क्रमांक घातल्यानंतर संबंधित घर मालकाचा कर किती आहे, हा आकडाच दिसत नाही. त्यामुळे ऑनलाईनद्वारे घरपट्टी जमा करण्यास सुरुवात केली तरी योग्यप्रकारे ऑनलाईनचे काम सुरू नसल्याने जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत अनेकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात केली जाते. या महिन्यात नवीन दरानुसार घरपट्टी आकारली जाते. मात्र यावर्षी घरपट्टी आकारण्याची सुरुवातच तक्रारीची ठरली आहे. एक तर चलन देताना त्यावर योग्यप्रकारे घरपट्टीची नोंद केली जात नाही. दरम्यान विविध विभागात रेडीरेकनरचे दर वाढले आहेत. तर काही विभागाचे दर कमी झाले आहेत. त्याची मार्गसूची योग्यप्रकारे जारी करण्यात आली नाही, अशा तक्रारीदेखील वाढल्या आहेत. कारण मागील वर्षांपेक्षा दुप्पट घरपट्टी आकारली जात आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

बेळगाव वन, तसेच इतर ठिकाणी ऑनलाईनद्वारे घरपट्टी आकारणी केली जात आहे. मात्र अनेकांचा पीआयडी क्रमांक दाखल केल्यानंतर रक्कमच दिसत नाही. त्याबाबत नागरिकांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता तातडीने जी समस्या निर्माण झाली आहे, त्याबाबत मुख्य ऑनलाईन सेंटरकडे  समस्या पाठवून सोडविण्यासाठी दिवसभर प्रयत्न सुरू होते. घरपट्टी भरण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसह जनतेला चलन देण्यात येत आहे. मात्र हे चलन देत असताना त्यावर घरपट्टीचा आकडा दुपटीने दाखल केला जात आहे. त्यामुळे अनेकांना धक्काच बसत आहे. वास्तविक रेडीरेकनरचे दर जाहीर झाल्यानंतर मनपानेही वाढलेल्या घरपट्टीबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. 5 ते 10 टक्के घरपट्टी वाढ करण्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात 100 हून अधिक टक्के करपट्टी वाढविण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. महानगरपालिकेच्या महसूल विभागाने याबाबत योग्य तो खुलासा करणे गरजेचे आहे. एप्रिल 30 पर्यंत घरपट्टी भरल्यास पाच टक्के सवलत दिली जाणार आहे. मात्र आता एप्रिलमधील 15 दिवस वाया गेले आहेत. त्यामध्येही वाढ करावी, अशी मागणी होत आहे. महत्त्वाचे म्हणजे घरपट्टीमध्ये दुपटीने वाढ केली आहे. ती प्रथम दुरुस्त करावी, त्यानंतर घरपट्टी आकारण्यास सुरुवात करा, अशी मागणीही केली जात आहे.

Advertisement

तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी...

महानगरपालिकेच्या belagavicitycorp.org या वेबसाईटवर घरपट्टी भरावी लागणार आहे. मात्र काहीजणांचा घरपट्टीसाठी पीआयडी क्रमांक दाखल केल्यानंतर त्यावर निश्चित केलेला घरपट्टीचा आकडाच दिसत नाही. त्यामुळे घरपट्टी भरणे अशक्य झाले आहे. सोमवारी सायंकाळी ऑनलाईनद्वारे घरपट्टी सुरू केली तरी मंगळवारी देखील दिवसभर समस्या निर्माण होत होत्या. तेव्हा महानगरपालिकेच्या महसूल विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.