मिरज-मंगळूर महालक्ष्मी एक्स्प्रेस सुरू करा
पर्यटनासह देवदर्शनालाही मिळणार चालना
बेळगाव : बेळगाव-मिरज या भागाला कोकण किनारपट्टीशी जोडण्यासाठी मंगळूर-मिरज महालक्ष्मी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. सध्या बेळगाव-मिरज मार्गावर पूर्णा एक्स्प्रेस वगळता इतर रेल्वे नसल्याने नागरिकांना एक तर गोवा अथवा हुबळीपर्यंत प्रवास करून तेथून मंगळूर गाठावे लागत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात महालक्ष्मी एक्स्प्रेस पूर्ववत करण्याची मागणी केली जात आहे. मंगळूर येथे अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये, मेडिकल कॉलेज असल्यामुळे बेळगाव परिसरातील अनेक विद्यार्थी त्याठिकाणी शिक्षण घेत आहेत. बेळगावहून मंगळूरला जाण्यासाठी पूर्णा एक्स्प्रेस ही एकमेव साप्ताहिक रेल्वे उपलब्ध आहे. मध्यंतरी मंगळूरच्या खासदारांनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन मिरज-मंगळूर एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी केली होती. परंतु दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने ही मागणी बारगळली. मिरज-मंगळूर या मार्गावर अनेक धार्मिक व पर्यटनस्थळे आहेत. मडगाव, कारवार, गोकर्ण, होन्नावर, मुरर्डेश्वर, उडुपी याठिकाणी पर्यटनास्थळांसोबतच अनेक मंदिरे आहेत. बेळगावमधून शेकडो भाविक पर्यटन व देवदर्शनासाठी याठिकाणी प्रवास करतात. त्यामुळे या मार्गावर एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दुपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याने एक्स्प्रेस सुरू करण्यास कोणतीच हरकत नाही. नैर्त्रुत्य रेल्वेने नागरिकांच्या या मागणीची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.