प्राथमिक शाळेचे बांधकाम त्वरित सुरू करा! अन्यथा तिव्र आंदोलनाचा शिवसेनेचा इशारा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सीईओना निवेदन
उचगाव/ वार्ताहर
गडमुडशिंगी ता.करवीर येथील केंद्रीय प्राथमिक शाळेला निधी मंजूर असतानाही गेले वर्षभर रखडलेल्या नवीन इमारतीचे बांधकाम त्वरित सुरू करावे अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट यांनी दिला.या मागणीचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांना निवेदन देण्यात आले.यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर उपस्थित होत्या.
उपनेते तथा जिल्हाप्रमुख संजय पवार व जिल्हा सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सीईओ यांची भेट घेऊन गडमुडशिंगी शाळेचे बांधकाम त्वरित सुरू करावे अशी मागणी केली.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, मी काही दिवसापूर्वी गडमुडशिंगी शाळेला भेट दिली.महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या सी. एस. आर. फंडातील नवीन आर. सी. सी. बांधकामाकरिता मंजूर निधीला जवळपास एक वर्ष उलटून देखील धोकादायक स्थितीत असणारी शंभर वर्ष जुनी कुमार आणि कन्या प्राथमिक शाळा पाठपुराव्याअभावी अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत. शिक्षणाचे मंदिर आपल्या भोंगळ व नियोजनशून्य कारभारामुळे दुर्लक्षित झाले असून कोल्हापूर सारख्या वैभवशाली जिल्हयातील गडमुडशिंगी गावाचं हे दुर्दैव म्हणावे लागेल.
उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट म्हणाले, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीसोबतचा नसलेला समन्वय आणि राजकीय श्रेयवाद यामुळे शाळेच्या नवीन बांधकामाची निविदा काढणे, ठेकेदार नेमणे आदी कामे पुढील कार्यवाहीसाठी अडून बसल्याने ना घर का ना घाट अशी बिकट अवस्था येथील ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची झाली आहे.शाळेच्या धोकादायक दुरावस्थेमुळे वर्षभरात शाळेतील पटसंख्या खासकरून कन्या शाळेची कमी होत असून विद्यार्थी खाजगी, लगतच्या गावातील शाळांमध्ये शिक्षणासाठी जात आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
शाळेची मोठ्या प्रमाणात झालेली पडझड व मोडतोड पाहता शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे पुढाकार घेऊन मुलांच्या जीवाला धोका नको म्हणून दोन्ही शाळांची बैठक व्यवस्था गावातीलच माध्यमिक शाळा, सांस्कृतिक सभागृह व खाजगी जागेमध्ये केली आहे.
यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने प्रशासनाने लोकभावनेची विशेषतः मुलांच्या शिक्षणाची गंभीरपणे दखल घेऊन शाळेच्या नवीन बांधकामाची पुढील कार्यवाही त्वरित सुरू करावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, कोल्हापूर जिल्ह्याच्यावतीने तीव्र जनआंदोलन उभे केले जाईल अशी सूचना वजा इशाराच निवेदनामार्फत दिला आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी योग्य माहिती घेऊन त्वरित कार्यवाही सुरू करू असे आश्वासन दिले.
यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गट उपनेते तथा जिल्हाप्रमुख संजय पवार , सह संपर्कप्रमुख विजय देवणे,उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे,करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, विनोद खोत, उपतालुकाप्रमुख राहुल गिरुले, दिव्यांग सेना, तालुकाप्रमुख संदिप दळवी, सुजित कोगे,शितल पाटील,मनोज कुरळे,अक्षय दांगट, राजू पांडुरंग यादव, मुरलीधर माळी व शिवसैनिक उपस्थित होते.