नवीन बुकींग कक्ष आठ दिवसांत सुरू करा
पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा
सुशोभिकरणाचे सर्व कामे फेब्रुवारी अखेर पूर्ण करण्याचे आदेश
रेल्वे स्टेशनसह सुशोभिकरणाच्या कामाची पाहणी
काम दर्जदार करण्याच्या सूचना
कोल्हापूर
रेल्वे स्टेशनवरील सुशोभिकरण, नुतनीकरणाचे काम दर्जदार झाले पाहिजे. नवीन उभारण्यात आलेले बुकींग कक्षाची सर्व कामे पूर्ण करून आठ दिवसांत सुरू करा, असे आदेश रेल्वे पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी दिले. सुशोभिरणाची सर्व कामे फेब्रुवारी अखेर पूर्ण झाली पाहिजे, अशा सक्त सूचनाही त्यांनी ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यास दिल्या आहेत.
राजेश कुमार वर्मा यांची पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाली असून त्यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे. कोल्हापूर ते लोणंद रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची तपासणीच्या दौऱ्यावर ते आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ते कोल्हापुरात आले. निवडीनंतरच हा त्यांचा प्रथमच कोल्हापूर दौरा होता. सकाळी सहाच्या सुमारास ते कोल्हापुरात दाखल झाले. त्यानंतर अंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर सकाळी 9.30 च्या सुमारास ते पुन्हा कोल्हापूर रेल्वे स्टेशन येथे आले. यावेळी त्यांनी रेल्वे स्टेशन, वर्कशॉप, चालक विश्रांती कक्षासह अमृत योजनेतून मिळालेल्या 43 कोटींच्या निधीतून रेल्वे स्टेशन येथे सुरू असणारी सुशोभिकरण, नुतनीकरणाच्या कामाची पाहणी केली.
पुणे विभागीय वणिज्य प्रबंधक डॉ. मिलींद हिरवे, निबंधक डॉ. रामदास भिसे, प्रकल्प बांधकाम विभाग प्रमुख विकास श्रीवास्तव, विद्युत विभाग प्रमुख श्री महेश्वरी, कोल्हापूर रेल्वे स्टेशनचे स्टेशन प्रमूख आर.के. मेहता, रेल्वे प्रवासी संघटनेचे सुशिल तराळ आदी उपस्थित होते.
महालक्ष्मी, कोयना एक्स्प्रेस गांधीनगर, रूकडीला थांबणार
महालक्ष्मी, कोयना एक्स्प्रेसच्या गाड्या पूर्वीप्रमाणे गांधीनगर, रूकडी स्थानकावर थांबविण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे शिवनाथ बियाणी यांनी केली. यावर राजेश कुमार वर्मा म्हणाले, यासंदर्भातील प्रस्ताव तयार केला असून रेल्वे बोर्डकडे मंजूरीसाठी पाठविली आहे. त्यांची मंजुरी मिळताच या गाड्याचे थांबे गांधीनगर, रूकडी येथे केले जातील. सह्यादी एक्स्प्रेस पुर्वीप्रमाणे मुंबईपर्यंत सुरू करा, रेल्वेचे क्रमांकावरील शुन्य काढा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याबाबतही ते सकारात्मक असल्याचे सांगितले.
तर पुन्हा आठ दिवसांनी येऊन तपासणार
सुशोभिकरणाच्या कामाबाबत वर्मा यांनी विभाग निहाय आढावा घेतला. बुकींग कक्षाच्या ठिकाणी सिव्हील वर्कचे काम, विद्युतची कामे आठ दिवसांत पूर्ण करू अशी ग्वाही संबंधित ठेकेदाराने दिली. यावर वर्मा यांनी आता आलो म्हणून वेळ मारून नेऊ नये. साहेब आले आणि सूचना केल्या आणि गेले असे होणार नाही. आठ दिवसांनी पुन्हा अचानक येऊन कामाची तपासणी करू. असा इशाराही दिला.