स्टारलिंकला लवकरच भारतात परवाना
दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची माहिती : कंपनी 840 मध्ये अमर्यादित डेटा देईल
नवी दिल्ली : दिग्गज अमेरिकन उद्योगपती व अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट योजनेला लवकरच भारतात ऑपरेटिंगचा परवाना मिळणार आहे, असे दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले. दूरसंचार विभागाने यापूर्वी स्टारलिंकला लेटर ऑफ इंटेंट दिले आहे. आता स्टारलिंकला फक्त इन स्पेसकडून अंतिम मंजुरी मिळणे आवश्यक आहे.
प्रक्रिया जवळजवळ पूर्ण : सिंधिया
सिंधिया म्हणाले, ‘सध्या दोन कंपन्यांना-वनवेब आणि रिलायन्सला सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीसाठी परवाने मिळाले आहेत. स्टारलिंकसाठीही, प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे. एलओआय जारी करण्यात आला आहे. मला विश्वास आहे की स्टारलिंकला लवकरच हा परवाना मिळेल. पुढचे पाऊल म्हणजे इन स्पेसकडून मान्यता मिळवणे आवश्यक आहे. ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी तिन्ही परवानाधारकांना या प्रक्रियेतून जावे लागेल.’
ट्राय स्पेक्ट्रमसाठी धोरणात्मक निकष
वनवेब आणि रिलायन्सला फक्त सुरुवातीच्या चाचणीसाठी मर्यादित स्पेक्ट्रम प्रवेश देण्यात आला आहे. अधिकृत परवाना मिळाल्यानंतर स्टारलिंकने हा मार्ग अवलंबण्याची अपेक्षा आहे. यानंतर भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) प्रशासकीय स्पेक्ट्रम वाटपासाठी धोरणात्मक निकष प्रदान करेल, जे व्यावसायिक रोलआउट नियंत्रित करेल, असेही सिंधीया यांनी स्पष्ट केले आहे.
स्टारलिंकचा भारतात 840 मध्ये अमर्यादित डेटा
एका वृत्तानुसार, स्पेसएक्स भारतात त्यांच्या स्टारलिंक उपग्रह इंटरनेट सेवा सुरू करेल ज्याची सुरुवातीची ऑफर अमर्यादित डेटा योजना 10 डॉलर किंवा सुमारे 840 रुपये प्रति महिना आहे. स्टारलिंकसह उपग्रह कंपन्यांचे लक्ष्य त्यांचा वापरकर्त्यांची संख्या वेगाने वाढवणे आहे. ते मध्य ते दीर्घकालीन कालावधीत 10 दशलक्ष किंवा 1 कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचू शकते. यामुळे कंपन्यांना मोठ्या स्पेक्ट्रम खर्चाची भरपाई करण्यास मदत होईल.