मणिपूरमध्ये स्टारलिंकसदृश उपकरण हस्तगत
सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू : मस्क यांनी फेटाळला दावा
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये स्टारलिंकसारखे उपकरण हस्तगत झाले आहे. याप्रकरणी स्पेसएक्सचे संस्थापक एलॉन मस्क यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. भारतावरील आकाशात स्टारलिंग सॅटेलाइट बीम बंद करण्यात आले आहे. आमच्या कंपनीच्या उपकरणाचा वापर अशांत मणिपूरमध्ये केला जात असल्याचा दावा चुकीचा असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे.
सुरक्षा दलांनी अलिकडेच इंफाळ पूर्व जिल्ह्यातील केराओ खुनौमध्ये छापेमारीत शस्त्रास्त्रs तसेच दारुगोळ्यासह काही इंटरनेट डिव्हाइस हस्तगत केले होते. भारतीय सैन्याच्या कोरने या जप्त करण्यात आलेल्या सामग्रीची छायाचित्रे शेअर केली होती. यानंतर सोशल मीडियावर यातील एका उपकरणावर स्टारलिंकचा लोगो असल्याचा दावा करण्यात आला होता.
स्टारलिंकचा वापर दहशतवाद्यांकडून केला जात आहे. एलन मस्क याकडे लक्ष देत या तंत्रज्ञानाचा गैरवापर नियंत्रित करण्यास मदत करतील अशी आशा असल्याचे एका एक्स युजरने म्हटले होते. यावर मस्क यांनी हा दावा चुकीचा असल्याचे नमूद केले आहे. उपग्रहीय इंटरनेट सेवा प्रदान करणारी मस्क यांची कंपनी स्टारलिंक जवळ भारतात संचालनाचा परवाना नाही.
तर मणिपूर पोलिसांनुसार केराओ खुनौमध्ये हस्तगत करण्यात आलेल्या सामग्रीत इंटरनेट सॅटेलाइट अँटेना, इंटरनेट सॅटेलाइट राउटर आणि 20 मीटर एफटीपी केबल सामील आहे. स्टारलिंक सारखे उपकरण हस्तगत झाल्यावर आता यंत्रणा ते संघर्षग्रस्त राज्यात कसे पोहोचले यासंबंधी तपास करत आहेत. मागील वर्षाच्या मे महिन्यापासून मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी-जो समुहांदरम्यान हिंसा सुरू होत असून यात 250 हून अधिक जण मारले गेले आहेत. तर हजारो लोक बेघर झाले आहेत