For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्टारलिंकचा भारतातील प्रवेश निश्चित?

07:00 AM Nov 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्टारलिंकचा भारतातील प्रवेश निश्चित
Advertisement

डेटा सुरक्षा नियमांनुसार परवाना मिळणार : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्कची सॅटेलाइट ब्रॉडबँड कंपनी स्टारलिंक लवकरच भारतात इंटरनेट सेवा पुरवू शकते असे केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आम्ही कोणत्याही कंपनीला परवाना देण्यास तयार आहोत. ‘स्टारलिंक किंवा इतर कोणत्याही कंपनीने आमच्या सुरक्षा आणि इतर नियमांचा आदर करण्यास तयार असले पाहिजे. परवाना ही एक विशिष्ट प्रक्रिया आहे, तुम्हाला सर्व नियम पडताळावे लागतील व त्यानंतरच परवाना मिळणार आहे.

Advertisement

स्टारलिंक नियमांचे पालन करण्यास तयार

एक दिवसापूर्वी असे वृत्त आले होते की दूरसंचार विभागासोबत झालेल्या बैठकीत, स्टारलिंकने उपग्रह ब्रॉडबँड सेवा परवान्यासाठी डेटा स्थानिकीकरण आणि सुरक्षिततेशी संबंधित नियमांचे पालन करण्यास सहमती दर्शविली आहे. मात्र, कंपनीच्या बाजूने यासाठी कोणताही करार करण्यात आलेला नाही. सॅटेलाइट सर्व्हिसेसद्वारे ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशन परवाना ही सॅटेलाइट इंटरनेट सेटअप करण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे. त्यानंतर नाममात्र अर्ज शुल्क भरून चाचणीसाठी स्पेक्ट्रम मिळवता येईल.

कंपन्यांना संपूर्ण डेटा ठेवणे बंधनकारक

सुरक्षेशी संबंधित नियमांनुसार, देशात कार्यरत सॅटेलाइट कम्युनिकेशन कंपनीला सर्व डेटा देशांतर्गत ठेवणे बंधनकारक आहे. इंटेलिजन्स एजन्सींना आवश्यक असल्यास डेटा कसा अॅक्सेस करता येईल हे स्पष्ट करण्यासाठी स्टारलिंकची देखील आवश्यकता असू शकते.

स्टारलिंकचा ऑक्टोबर 2022 मध्ये परवान्यासाठी अर्ज

स्टारलिंकने ऑक्टोबर 2022 मध्ये या परवान्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर, कंपनीने स्पेस रेग्युलेटर, इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटरकडे मंजुरीसाठी अर्ज केला होता. परंतु अंतिम मंजुरीसाठी अतिरिक्त तपशील मागवले आहेत. जेव्हा सरकार किंमत आणि स्पेक्ट्रम वाटपाचे नियम ठरवेल तेव्हा भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू होईल. ही प्रक्रिया तेव्हाच सुरू होऊ शकते जेव्हा भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण त्यांच्या शिफारसी जारी करेल, ज्या डिसेंबरच्या अखेरीस अपेक्षित असल्याचीही माहिती आहे.

Advertisement
Tags :

.