Vari Pandhrichi 2025: उभा कटी ठेऊनी हात
सासवड / ह.भ.प अभय जगताप :
जेथें वेदा न कळे पार।
पुराणासी अगोचर ।।
तो हा पंढरीराणा ।
बहु आवडतो मना।।
सहा शास्त्र शिणलीं।
मन मौनचि राहिली।।
सेना म्हणे मायबाप ।
उभा कटी ठेऊनी हात।।
सेना महाराज हे महाराष्ट्रासह उत्तर भारतात प्रसिद्ध असलेले संत. संत नामदेवरायांप्रमाणेच त्यांच्याही काही रचना शीखांच्या पवित्र ‘गुरु ग्रंथ साहेब’मध्ये समाविष्ट आहेत. बहुतेक सर्व वारकरी संतांप्रमाणे त्यांनीही प्रपंचाचा त्याग केला नव्हता. केस कापणे, दाढी करणे वगैरे व्यवसाय करतच त्यांची भगवद्भक्ती सुरू होती. अर्धा दिवस व्यवसाय करायचा व त्यानंतर अर्धा दिवस भगवद् चिंतनात घालवायचा हा नियम त्यांनी कटाक्षाने पाळला. मध्यप्रदेशमधील बांधवगडचे रहिवासी असलेले सेना महाराज महाराष्ट्रात आले.
सर्व संतांना भेटले. त्यांनी मराठीत अभंग रचना केल्या. त्यामध्ये संतांचे व पांडुरंगाचे वर्णन केले आहे. पांडुरंगाचे वर्णन करताना या अभंगात ते म्हणतात की पांडुरंगाचा पार वेदांनाही कळला नाही. पुराणांनाही तो अगोचर आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे चार वेद आहेत यांना श्रुती असेही म्हणतात. हे वेद कोणी निर्माण केले नाहीत तर ते भगवंताच्या श्वासातून बाहेर पडले असे मानले जाते. म्हणून त्यांना अपौरुषेय असेही म्हणतात. वेदांना असलेल्या अतिशय महत्त्वामुळेच काहीजण हिंदू धर्माला वैदिक धर्म असे म्हणतात तर काहीजण वैदिक असे हिंदूंचे दोन मुख्य प्रवाह मानतात.
याशिवाय विविध देवतांची वर्णन करणारी 18 मुख्य आणि 18 उप एकूण 36 पुराणे आहेत.या पुराणांची रचना करताना त्या त्या देवतेला महत्त्व देणाऱ्या कथा रचल्या आहेत. न्याय, योग, वैशेषिक, सांख्य, वेदांत आणि मीमांसा अशी सहा शास्त्रs सुद्धा त्याच्या स्वरूपाचे वर्णन करू शकली नाहीत आणि शांत राहिली. शेवटी सेना महाराज म्हणतात-असा हा आमचा मायबाप असलेला पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे. वारकरी संतांनी देवाशी आई-वडिलांचे नाते जोडले आहे. मुलाचा विकास व्हावा उद्धार व्हावा, अशी आई वडिलांची कळकळ असते. त्याप्रमाणेच आपल्या हिताविषयी देवालाही काळजी असते. त्यामुळे या मार्गामध्ये देव आपला सहकारी होतो. इतर मार्गाने देवाला जाणून पाहणाऱ्या वेदशास्त्रsपुराणे यांना तो अगम्य राहतो आणि त्याच्या प्रेमळ भक्तांना तो सुलभ होतो. हरिपाठमध्ये माउलींनी सुद्धा ‘चहुवेदी जाण शाही शास्त्राr कारण ।अठराही पुराने हरीसी गाती । असं म्हटलं आहे.