पावसामुळे उभे भातपीक झाले आडवे
ऐन सुगीच्या काळात खानापूर तालुक्यातील पिकांची स्थिती : भात जमिनीवर पडून मोठे नुकसान
वार्ताहर/नंदगड
भात हे खानापूर तालुक्यातील प्रमुख पीक आहे. यावर्षी खानापूर तालुक्यातील 35 हजार हेक्टर भाताची लागवड करण्यात आली आहे. भात पेरणीनंतर पावसाने बऱ्यापैकी साथ दिली. आता ऐन सुगीच्या काळात पावसामुळे उभे भातपीक जमिनीला टेकले आहे. खानापूर तालुक्यात भाताची पेरणी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली जाते. तालुक्यातील नंदगड, बिडी, गोधोळी, हलगा, कापोली, लोंढा, गुंजी, चापगाव, रामगुरवाडी, इदलहोंड, गर्लगुंजी, गंदीगवाड, देवलत्ती, खानापूर आदी भागात भाताची पेरणी केली जाते. तर जांबोटी, कणकुंबी, शिरोली भागात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतवडीत मुबलक पाऊस झाल्यावर भाताच्या रोपांची लागवड केली जाते. यावर्षी वेळोवेळी पाऊस झाल्याने हंबडण, भाताची वाढ बऱ्यापैकी झाली आहे. भाताचे लोंब उत्तम आले आहे. कापणीसाठी भात सज्ज आहे. कापणीसाठी सर्व काही तयारी शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु गेल्या आठवड्याभरापासून पाऊस पडत आहे. पावसामुळे उभे असलेले भातपीक जमिनीला टेकल्याने दाणे जमिनीवर पडून नुकसान झाले आहे.