Vari Pandhrichi 2025: उभे आणि गोल रिंगण
पालखी सोहळ्यात रिंगण असा एक प्रकार असतो. रिंगण दोन प्रकारची आहेत. गोल रिंगण आणि उभे रिंगण. उभी रिंगणे पालखीबरोबर तीन होतात. लोणंद ते तरडगाव यांच्यामध्ये चांदोबाचा लिंब या ठिकाणी, त्यानंतर बाजीरावाची विहीर या ठिकाणी आणि पंढरपूर येथील पादुकांजवळ. अशी तीन उभी रिंगणे रस्त्याच्या मधोमध होतात. मधोमध सर्व सोहळा उभा राहतो. सर्व वारकऱ्यांना चोपदारांनी इशारा केल्यानंतर दोन्ही बाजूला वारकरी उभे राहतात आणि मग मधून अश्व सोडले जातात.
अश्व पालखीला उजवी घालून परत येतात, पालखीचे दर्शन घेतात, तिथे अश्वाचा सन्मान केला जातो. ते पुन्हा पुढे येतात आणि मग उडी किंवा आरती होते. त्यानंतर पालखी सोहळा मार्गस्थ होतो. याच प्रकारे वाटेत चार गोल रिंगणे होतात. पहिले गोल रिंगण सदाशिवनगर किंवा पुरंदावडे या ठिकाणी होते.
दुसरे खडूस फाटा या ठिकाणी होते. तिसरे ठाकूरबुवांची समाधी येथे होते आणि चौथे सर्वात मोठे असणारे गोल रिंगण वाखरीत बाजीरावाची विहीर या ठिकाणी होते. अश्वांनी तीन फेर्या मारून रिंगण पूर्ण केले, की रिंगणाची त्या ठिकाणी समाप्ती होते. रिंगणानंतर उडीचा कार्यक्रम होतो. तो उडीचा कार्यक्रम देखील अतिशय पाहण्यासारखा होतो. चोपदारांनी निमंत्रण दिलेल्या सर्व दिंड्यांमधील टाळकरी, वीणेकरी, पखवाजवादक, हंडेवाले, तुळशीवृंदावनधारी महिला पालखीजवळ जमतात. नंतर सर्वजण बसून तालावर भजन करतात.