आपल्या पायावर उभे रहा !
सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला सूचना, दोन्ही पक्षांचे अस्तित्व भिन्न असल्याची टिप्पणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आता आपल्या पायावर उभे राहण्याची आवश्यकता असून या गटाने शरद पवार यांचे छायाचित्र आणि त्यांचे व्हिडीओज यांचा उपयोग प्रचार कार्यात करु नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे अस्तित्व आता एकमेकांपासून वेगळे झाले आहे. त्यामुळे अजित पवार गटाने आपल्या स्वतंत्र ओळखीवर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाग घ्यावा, अशी सूचनाही न्यायालयाने केली.
अजित पवार गटाकडून शरद पवार यांची छायाचित्रे आणि काही व्हीडीओज यांचा उपयोग प्रचारकार्यात केला जात आहे. यामुळे मतदारांची दिशाभूल होऊ शकते. म्हणून या गटाला तसे करण्यास बंदी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. या याचिकेवर न्या. सूर्यकांत आणि न्या. उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली. अजित पवार गटाने सर्व आरोपांचा इन्कार न्यायालयात केला.
शरद पवार गटाचा आरोप
न्यायालयात शरद पवार गटाची बाजू अभिषेक मनू सिंघवी यांनी मांडली. अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या छायाचित्रांचा आणि व्हिडिओंचा उपयोग केला जात आहे. या पक्षाचे उमेदवार अमोल मिटकरी यांनी शरद पवार यांचे व्हिडिओ दाखवत प्रचार चालविला आहे, असे प्रतिपादन सिंघवी यांनी केले. या गटाला तसे करण्यापासून रोखण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
अजित पवार गटाकडून इन्कार
या सर्व आरोपांचा अजित पवार गटाकडून इन्कार करण्यात आला. याचिकाकर्त्यांनी सादर केलेले व्हिडीओज बनावट आहेत. आम्ही आमच्या बळावरच प्रचारकार्य करीत आहोत. शरद पवार गटाच्या कोणत्याही चिन्हांचा अगर छायाचित्रांचा किंवा व्हिडीओंचा उपयोग आम्ही करत नाही. न्यायालयासमोर सादर करण्यात आलेले पुरावे बनावट आहेत, असे प्रतिपादन या गटाने केले. यावर, असा प्रचार मिटकरी यांच्या अधिकृत हँडलवरुन होत आहे. ग्रामीण भागात ही दृष्ये पाहिली जात आहेत, असा दावा सिंघवी यांनी केला.
न्या. सूर्यकांत यांचे प्रश्न
युक्तीवाद ऐकल्यानंतर न्या. सूर्यकांत यांनी शरद पवार गटाला अनेक प्रश्न विचारले. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील विवाद महाराष्ट्रातील जनतेला माहीत नाहीत, असे आपल्याला वाटते काय ? तसेच व्हिडीओ दाखविल्याने ग्रामीण भागातील जनता सोशल मिडिया पोस्टमुळे प्रभावित होत आहे, अशी आपली भावना आहे काय, असाही प्रश्न शरद पवार गटाला विचारण्यात आला.
हा नवा भारत
हा नवा भारत आहे. आम्हाला दिल्लीत जे सोशल मिडियावरुन पहावयास मिळते, ते महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आधीच पोहचत आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात अद्यापही संपर्क आणि सलोखा आहे, असे भासविण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून होत आहे, जेणेकरुन या गटाचे अधिक उमेदवार निवडून येतील. न्यायालयाने या संबंधी आदेश द्यावा आणि तो पाळण्यास अजित पवार गटाला भाग पाडावे, अशी मागणी सिंघवी यांनी केली.
अजित पवार गटाला आदेश
सोशल मिडियावर पोस्ट करण्यात आलेले व्हिडीओ खरे असोत किंवा खोटे असोत किंवा ते पूर्वीचे असोत, अजित पवार गटाने त्यांचा उपयोग करु नये. दोन्ही गटांच्या विचारधारा भिन्न आहेत. अजित पवार गट सरळसरळ शरद पवार गटाविरोधात निवडणूक लढवित आहे. अशा स्थितीत अजित पवार गटाने आता स्वबळावर निवडणुकीत भाग घ्यावा, अशी सूचना न्यायालयाने केली. आता अधिक वेळ उरलेला नाही. अजित पवार गटाने स्वतंत्र पद्धतीने आणि शरद पवार गटावर कोणत्याही स्थितीत, कशासाठीही अवलंबून राहू नये, अशीही सूचना केली गेली.