चेंगराचेंगरी : हायकमांडने मागितला अहवाल
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वरिष्ठांची भेट घेणार : सिद्धरामय्या यांचे आज दिल्लीला प्रस्थान
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे अहवाल मागितला आहे. तसेच वरिष्ठांच्या निमंत्रणावरून सिद्धरामय्या मंगळवारी दिल्लीला रवाना होणार आहेत. सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी भेट घेणार आहेत. उभय नेते वरिष्ठांना बेंगळूरमधील चेंगराचेंगरीची घटना आणि या मुद्द्यावरून निर्माण झालेला वाद याविषयी माहिती देतील.
आरसीबीच्या विजयोत्सवावेळी बेंगळूरमधील चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे. कर्नाटक सरकारने घाईगडबडीत आरसीबीच्या विजयोत्सवाला परवानगी दिल्याचा ठपका विरोधी पक्षांनी ठेवला आहे. या मुद्द्यावरून भाजप व इतर पक्षांनी काँग्रेस नेत्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसौध आवारात आरसीबीच्या खेळाडूंचा सरकारकडून सत्कार करण्यात आल्याने जनतेत रोष आहे. याविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीत वरिष्ठांची भेट घेऊन स्पष्टीकरण देतील. शिवकुमार हे सध्या दिल्लीत आहेत त्यामुळे मंगळवारी सिद्धरामय्या सकाळी दिल्लीला रवाना होतील.
मॅजिस्ट्रेटची जखमींना नोटीस
चेंगराचेंगरीच्या घटनेसंबंधी मॅजिस्ट्रेटमार्फत तपास सुरू असून बेंगळूर जिल्हाधिकारी जी. जगदीश यांनी सोमवारी चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांना नोटीस बजावली असून चौकशीला हजर राहण्याची सूचना दिली आहे. चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. 56 जण जखमी झाले होते. जखमींपैकी 45 जणांना नोटीस बजावली असून बुधवार 11 जून रोजी चौकशीला हजर राहून जबानी द्यावी, अशी सूचना दिली आहे.
मागास समुदायातील मठाधीशांची ईडीकडे तक्रार
आरसीबीच्या विजयोत्सवावेळी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेसंबंधी अतिमागास समुयादातील काही मठाधीशांनी ईडीकडे तक्रार केली आहे. आरसीबी ही एक व्यावसायिक संस्था आहे. आपल्या वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आरसीबीच्या आर्थिक व्यवहारासंबंधी तपास करावा तसेच कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने (केएससीए) नावलौकिक मिळविण्यासाठी पैसे दिल्याचे समजते. कार्यक्रमाच्या निमित्ताने पैसे जमवून इतर ठिकाणी वापर करण्यात आला आहे. सरकार, बीसीसीआयकडूनही पैसे मिळवून बोगस हिशोब दिला आहे. या पार्श्वभूमीवर केएससीएचीही चौकशी करावी, अशी विनंती मठाधीशांनी ईडीकडे केली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांविरुद्धही तक्रार
अतिमागास समुदायाच्या मठाधीशांनी बेंगळूरमधील कब्बनपार्क पोलीस स्थानकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर आणि आरसीबी व्यवस्थापनाविरुद्ध तक्रार दिली आहे. या सर्वांच्या दुर्लक्षामुळे आरसीबीच्या 11 चाहत्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी विनंती केली आहे.
आयपीएस अधिकाऱ्याची सीएटीकडे याचिका
चेंगराचेंगरीच्या घटनेवेळी कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून राज्य सरकारने 5 जून रोजी बेंगळूरचे तत्कालिन पोलीस आयुक्त बी. दयानंद यांच्यासह पाच पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. पोलिसांवरील कारवाईमुळे अनेकांनी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या आदेशाला आक्षेप घेत आयपीएस अधिकारी विकासकुमार यांनी केंद्रीय प्रशासकीय लवादाकडे (सीएटी) याचिका दाखल केली आहे.
एफआयआर रद्दसाठी आरसीबीचीही याचिका
चेंगराचेंगरीच्या प्रकरणासंबंधी आपल्याविरुद्ध दाखल झालेला एफआयआर रद्द करावा, अशी याचिका आरसीबीचे सीओओ राजेश मेमन, निखिल सोसले, डीएनए इव्हेंट मॅनेजमेंटचे सीनील मॅथ्यू, किरणकुमार, सुमंत माविनकेरे यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. कार्यक्रम आयोजनात सरकारची भूमिका होती. त्यामुळे दुर्घटनेला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. सदर याचिकेवर उच्च न्यायालय 10 जून रोजी सुनावणी करणार आहे.
डीएनए इव्हेंट मॅनेजमेंटचा सरकारवर गंभीर आरोप
डीएनए एन्टरटेन्मेंटने सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. विधानसौध, चिन्नास्वामी स्टेडियममधील कार्यक्रम ही सरकार व केएससीएची योजना होती. आरसीबी विजयोत्सवात सहभागी होण्यासाठी सरकारनेच आवाहन केले होते, असा उल्लेख डीएनए इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने रिट याचिकेत केला आहे. आरसीबीच्या व्हिक्टरी परेडला परवानगी मिळविण्यासाठी 3 जून रोजी पत्र पाठविले होते. खुल्या बसमधून परेड करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. राज्य सरकारने विधानसौधसमोर कार्यक्रम आयोजिण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी विधानसौधच्या कार्यक्रमाला अधिक सुरक्षा पुरविली. चिन्नास्वामी स्टेडियमजवळ पुरेसे पोलीस नव्हने. डीएनएन कंपनीकडूनच 584 खासगी कर्मचारी नेमण्यात आले होते. सरकारने आपले अपयश लपविण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांना अटक करण्याची सूचना दिली, असा आरोपही केला.