For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंदिरात चेंगराचेंगरी, 8 जणांचा मृत्यू

06:33 AM Apr 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
मंदिरात चेंगराचेंगरी  8 जणांचा मृत्यू
Advertisement

बिहारमधील नालंदा येथील घटना, चौकशी होणार

Advertisement

वृत्तसंस्था / पाटणा

बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील माघरा ग्रामी असलेल्या सुप्रसिद्ध शीतला माता मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 8 भाविकांचा मृत्यू झाला आहे. चैत्र महिन्याचा शेवटचा मंगळवार असल्याने मंदिरात प्रचंड संख्येने भाविक आले होते. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे मंदिराच्या व्यवस्थापकांना कठीण झाले होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली, अशी माहिती स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

Advertisement

चेंगराचेंगरीला प्रारंभ झाल्यानंतर त्वरित पोलिसांना कळविण्यात आले. त्यांनी येऊन साहाय्यता कार्याला प्रारंभ केला. अनेक भाविकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. तथापि, 8 भाविक प्राणांस मुकले आहेत. सहा भविक जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार केले जात आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रत्येक मृत भाविकामागे सहा लाख रुपयांचे सानुग्रह साहाय्य घोषित केले आहे. राज्य सरकारच्या आपदा साहाय्यता विभागाकडून प्रत्येकी चार लाख रुपये, तर मुख्यमंत्री निधीतून अतिरिक्त 2 लाख रुपये असे एकंदर सहा लाख रुपये साहाय्यार्थ देण्यात येणार आहेत. जखमींवरील उपचाराचा खर्चही राज्य सरकार करणार आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचा आदेश प्रशासनाने दिला आहे.

कारणांचे संशोधन

ही दुर्घटना का आणि कशी घडली, याचे संशोधन केले जाणार आहे. पोलिसांच्या तपासाला त्वरित प्रारंभ करण्यात आला. भाविकांनी एकाचवेळी मंदिराबाहेरुन आत जाण्याचा आणि मंदिरातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केल्याने ही दुर्घटना घडली असावी, असे अनुमान व्यक्त करण्यात आले आहे. मात्र, खरे कारण तपासानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये महिला आणि मुलांची संख्या मोठी होती. दुर्घटनेनंतर मंदिर परिसर रिक्त करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्था वाढविल्याची माहिती देण्यात आली.

आंध्र प्रदेशातही अशीच घटना

आंध्र प्रदेश राज्यातही गेल्यावर्षी अशीच घटना घडली होती. सुप्रसिद्ध व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 9 भाविकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये अधिकतर महिला आणि बालकांचा समावेश होता. तर 13 भाविक जखमी झाले होते. अचानक भाविकांचा पूर लोटल्याने ती घटना घडलेली होती.

Advertisement
Tags :

.