For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्ली रेल्वेस्थानकावर चेंगराचेंगरी

06:58 AM Feb 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
दिल्ली रेल्वेस्थानकावर चेंगराचेंगरी
Advertisement

महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे 18 जणांचा मृत्यू : रेल्वेंचे वेळापत्रक कोलमडल्याने दुर्घटना

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील रेल्वेस्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यासाठी जाण्यासाठी भाविकांची रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी झाल्याने ही दुर्घटना घडली आहे. रेल्वे विभागाकडून या दुर्घटनेच्या तपासासाठी चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. तथापि, जादा-विशेष रेल्वेमुळे दैनंदिन वेळापत्रक कोलमडल्यानंतर स्थानकावर प्रवासी व भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने ही चेंगराचेंगरीची घटना घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मृतांमध्ये 14 महिला आणि 3 मुले आहेत. तसेच 25 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यापूर्वी 29 जानेवारी रोजी प्रयागराजच्या महाकुंभात 30 जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला होता.

Advertisement

 

नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म 14 आणि 15 वर रात्री 9:55 वाजता चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या चार गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना उपचारासाठी दिल्लीतील लोकनायक रुग्णालयात नेण्यात आले. राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री, उपराष्ट्रपती आणि इतर अनेक मान्यवरांनी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त केला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना रेल्वेने प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. गंभीर जखमींना 2.5 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 1 लाख रुपये देण्यात येतील, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.  दरम्यान, दिल्ली पोलिसांनी मृतांच्या नावांची यादी जाहीर केली आहे.

मृतांमध्ये बिहारमधील नऊ, दिल्लीतील आठ आणि हरियाणातील एका भाविकाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. रेल्वेस्थानकावरील प्रचंड गर्दीमुळे अनेकांचा गुदमरून मृत्यू झाला. बहुतेक मृतदेहांच्या छातीवर आणि पोटावर जखमा होत्या. हा अपघात प्लॅटफॉर्म क्रमांक 13, 14 आणि 15 दरम्यान झाला. महाकुंभाला जाण्यासाठी दुपारी 4 वाजल्यापासून स्टेशनवर गर्दी जमू लागली होती. रात्री 8.30 च्या सुमारास प्रयागराजला जाणाऱ्या 3 गाड्या उशिराने धावल्यामुळे गर्दी वाढली. प्रत्यक्षदर्शीनुसार, ट्रेनचा प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून 16 करण्यात आल्यामुळे चेंगराचेंगरी झाली.

 

द्विसदस्यीय चौकशी समिती स्थापन

अपघाताच्या चौकशीसाठी दोन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात उत्तर रेल्वेचे दोन अधिकारी नरसिंग देव आणि पंकज गंगवार यांचा समावेश आहे. समितीने नवी दिल्ली रेल्वेस्थानकाचे सर्व सीसीटीव्ही व्हिडिओ फुटेज सुरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वे मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. याप्रकरणी तपास सुरू झाला आहे.

नवी दिल्ली रेल्वेस्थानकावरील चेंगराचेंगरी प्रकरणावर उत्तर रेल्वेचे सीपीआरओ हिमांशू शेखर उपाध्याय यांनी अधिकृत निवेदन केले आहे. ‘या अपघाताबद्दल आपण सर्वजण खूप दु:खी आणि शोकमग्न आहोत. या अपघातात 18 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. रेल्वेमंत्र्यांनी मृतांच्या सर्व कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही रक्कम जवळजवळ सर्व वारसांना वाटण्यात आली आहे. समितीने चौकशी सुरू केली आहे. वस्तुस्थिती तपासली जात आहे आणि तपास अहवाल लवकरच येईल’, असे ते पुढे म्हणाले.

रेल्वेचे अधिकृत निवेदन

एका अधिकृत निवेदनात रेल्वेने म्हटले आहे की, शनिवारी संध्याकाळी सुमारे 9:30 वाजण्याच्या सुमारास नवी दिल्ली स्थानकावरील प्लॅटफॉर्म 13 आणि 14 वर अभूतपूर्व गर्दीची परिस्थिती निर्माण झाली. प्रवाशांच्या संख्येत अचानक वाढ झाल्यामुळे काही लोक बेशुद्ध पडले. त्यानंतर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याच्या अफवा पसरल्या आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरली. नंतर जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. रेल्वे सुरक्षा दल आणि दिल्ली पोलिसांनी तत्परता दाखवत बेशुद्ध आणि जखमी प्रवाशांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे सांगण्यात आले.

...अशी घडली दुर्घटना !

प्रयागराज स्पेशल ट्रेन, भुवनेश्वर राजधानी एक्स्प्रेस आणि स्वतंत्र सेनानी एक्स्प्रेस या तीन रेल्वेंमधील विस्कळीतपणामुळे फलाटांवर झालेल्या भाविकांचा गोंधळ उडाला. भुवनेश्वर राजधानी आणि स्वतंत्र सेनानी या दोन एक्स्प्रेस उशिराने धावत होत्या. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर तिन्ही गाड्यांच्या प्रवाशांनी गर्दी केली होती. प्रयागराज विशेष ट्रेन फलाटावर पोहोचली तेव्हा भुवनेश्वर राजधानी एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्र. 16 वर येत असल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळेच प्रवाशांची तारांबळ उडाली.

...अन् परिस्थिती बिकट झाली!

प्रयागराज एक्स्प्रेसने प्रवास करण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर बरेच लोक जमले होते. प्रयागराजला जाणाऱ्या गाडीसाठी 1,500 जनरल तिकिटे विकली गेल्यामुळे गर्दी अनियंत्रित झाली. याचदरम्यान स्वतंत्र सेनानी एक्स्प्रेस आणि भुवनेश्वर राजधानी उशिरा दाखल झाल्या. या दोन्ही गाड्यांचे प्रवासीही प्लॅटफॉर्म क्रमांक 12, 13 आणि 14 वर उपस्थित होते. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जवळील एस्केलेटरजवळ चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. तिकीट काउंटरवर बरेच लोक होते. यापैकी 90 टक्के प्रयागराजला जात होते. अचानक रेल्वे आल्याची घोषणा झाली आणि लोक तिकिटे न घेता प्लॅटफॉर्मकडे धावल्यामुळे चेंगराचेंगरी झाली.

पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली

नवी दिल्ली रेल्वेस्थानकावरील चेंगराचेंगरीमुळे मी दु:खी आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. अशा श्रद्धांजलीपर भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. चेंगराचेंगरीत बाधित झालेल्या सर्वांना अधिकारी मदत करत आहेत. जखमींना योग्य ते लाभ व वैद्यकीय मदत पुरविली जाणार असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

अपघाताला जबाबदार कोण? : काँग्रेसचा सवाल

इंस्टाग्रामवरील एका पोस्टद्वारे काँग्रेसने म्हटले आहे की, ‘महाकुंभाला जाणाऱ्या अनेक भाविकांच्या मृत्यूची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. मोदी सरकारने मृतांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सोपवावेत आणि त्यांना त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था करावी. तसेच काँग्रेस पक्षाने विचारले की जर सरकारला महाकुंभ सुरू आहे हे माहित होते, तर त्या काळात अधिक गाड्या का चालवल्या गेल्या नाहीत? रेल्वे स्थानकावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी कोणतीही व्यवस्था का केली गेली नाही? या अपघाताला कोण जबाबदार आहे? असे प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आले आहेत.

पोलिसांकडून वारंवार उद्घोषणा

‘...जर तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा असेल तर परत जा’, अशी उद्घोषणा पोलिसांकडून केली जात होती अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. स्टेशनवर इतकी गर्दी होती की पाय ठेवायलाही जागा नव्हती. रेल्वेही लोकांनी खचाखच भरलेली होती. कन्फर्म तिकीट असलेले लोकही डब्यात प्रवेश करू शकले नाहीत. अशा गर्दीमध्ये रेल्वेत जागा मिळविण्यासाठी भाविकांची झुंबड उडाल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.