केरळमध्ये मंदिरात उत्सवादरम्यान हत्ती बिथरल्याने चेंगराचेंगरी
तिरुअनंतपुरम :
केरळमध्ये एका मंदिरात हत्ती अचानक आक्रमक झाला आणि त्याने लोकांवर हल्ला केला. या घटनेत 20 हून अधिक जण जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. केरळच्या मल्लपुरम येथील तिरुर येथे ही घटना घडली आहे. मंगळवारी रात्री मंदिरात उत्सव सुरू असताना रात्री 1 वाजण्याच्या सुमारास उत्सवात सामील हत्तींपैकी एक हत्ती आक्रमक झाला, त्याने लोकांवर हल्ला केला. याहू थंगल श्राइनमध्ये चार दिवसांपासून सुरू असलेल्या उत्सवादरम्यान 5 हत्ती एकाच ठिकाणी उभे होते, यातील पक्कोथ श्रीकुट्टन नावाच्या हत्तीने अचानक समोर उभे असलेल्या लोकांवर धावून जात हल्ला केला. हत्तीने तेथे उभे असलेल्या एका व्यक्तीला सोंडेत दाबून धरले आणि नंतर गर्दीत फेकून दिले. या व्यक्तीला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. हत्ती आक्रमक होताच लोक इकडे-तिकडे पळू लागल्याने मंदिरात चेंगराचेंगरीचा प्रकार घडला. या दुर्घटनेत सुमारे 24 जण जखमी झाले असून यातील 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. चेंगराचेंगरीमुळे लोक जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. तर काही वेळातच हत्तीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.