Karad News : कराडमध्ये रस्त्यांची रखडलेली कामे सुरू
विठ्ठल चौक रस्त्याची कामे पुन्हा सुरळीत सुरू
कराड : पावसाळा आणि नगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेली शहरातील विविध रस्त्यांची कामे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या सूचनेनंतर पालिकेने सुरू केली आहेत. डांबरीकरण सुरू झाल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. राजेंद्रसिंह यादव यांनी पालिकेतील प्रशासक राजवटीत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध रसघांसाठी निधी आणला होता. यात रस्ते कारपेट व बंदिस्त गटरच्या कामांचा समावेश होता.
या कामांचे भूमिपूजन नगरपालिका निवडणुकीपूर्वी झाले होते. कामे सुरूही झाली होती. मात्र पावसाळ्यामुळे व त्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने ही कामे अर्धवट स्थितीत होती. मुख्य गावठाणातील रस्त्यांची ही कामे होती. नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या यादव यांनी ही कामे पुन्हा सुरू करण्याच्या सूचना पालिका प्रशासन व ठेकेदारास केल्या होत्या.
त्यानुसार ही कामे गुरुवारपासून पुन्हा सुरू झाली. यामध्ये प्रामुख्याने सातशहीद ते आझाद चौक रस्ता, नेहरू चौक ते श्रीराम मंदिर रस्ता, बैंक ऑफ इंडिया ते आयवा चौक रस्ता, चांभार गल्ली, मंडईतील रस्ता, अशोक चौक ते मारूती मंदिर, विठ्ठल चौक या रस्त्यांची कामे पुन्हा सुरू झाली. हे रस्ते अर्धवट स्थितीत असल्याने वाहनधारक आणि नागरिकांची गैरसोय होत होती.
आता कामे सुरू झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. याबरोबरच इतर रस्त्यांवर खड्डे पडले असून ते तात्काळ बुजवावेत, अशी मागणी होत आहे.