For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रखडलेला फूट ओव्हर ब्रिज अन् अधिकाऱ्यांची आश्वासने

06:27 AM Aug 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
रखडलेला फूट ओव्हर ब्रिज अन् अधिकाऱ्यांची आश्वासने
Advertisement

बेळगाव रेल्वे स्थानकातील प्रकार : दोन वर्षे उलटली तरी अद्याप काम अपूर्णच

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव रेल्वे स्थानकातील फूट ओव्हर ब्रिजचे काम दोन वर्षे झाली तरी अद्याप पूर्ण झालेले नाही. सध्या या ओव्हर ब्रिजचा काही भाग सुरू करण्यात आला असला तरी काम पूर्ण न झाल्याने तो पूर्ण क्षमतेने वापरला जात नाही. खासदारांनी कंत्राटदाराला ताकीद देऊनदेखील विलंब झाला आहे. त्यामुळे या रखडलेल्या फूट ओव्हर ब्रिजची चर्चा सध्या शहरात रंगली आहे.

Advertisement

बेळगाव रेल्वे स्थानकाचे काही वर्षांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले. त्यावेळी करण्यात आलेला फूट ओव्हर ब्रिज हा रेल्वे स्थानकाच्या एका बाजूला होता. त्यामुळे प्लॅट फॉर्म क्र. 2, 3 व 4 वर पोहोचताना अडचणी येत होत्या. त्यामुळे प्रवेशद्वारानजीकचा जुना फूट ओव्हर ब्रिज पाडून त्या ठिकाणी नवा फूट ओव्हर ब्रिज बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली.

मागील दोन वर्षांपासून या फूट ओव्हर ब्रिजचे काम सुरू आहे. जेवढा वेळ रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणासाठी लागला त्यापेक्षाही अधिक वेळ सध्या फूट ओव्हर ब्रिजला लागला आहे. अद्यापही प्रवेशद्वाराकडचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे हा फूट ओव्हर ब्रिज नेमका केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न प्रवाशांमधून विचारला जात आहे.

खासदारांच्या सूचनेकडेही दुर्लक्ष

खासदार जगदीश शेट्टर यांनी जून 2025 मध्ये रेल्वे स्थानकाला भेट देऊन फूट ओव्हर ब्रिजच्या कामाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वास्तविक हा फूट ओव्हर ब्रीज डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु 2026 चा ऑगस्ट महिना उजाडला तरी अद्याप काम पूर्ण न झाल्याने खासदारांच्या सूचनेकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement
Tags :

.