सेंट झेवियर्स, जोसेफ, डीपी संघ विजयी
बेळगाव : फॅब स्पोर्ट्स क्लब दीपा रेडेकर स्मृती चषक आंतरशालेय मुलींच्या सेवन ए साईड फुटबॉल स्पर्धेत उद्घाटनाच्या दिवशी सेंट झेवियर्स, सेंट जोसेफ, सेंट जोसेफ-संतिबस्तवाड, डीपी संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन विजयी सलामी दिली. सक्षम स्पोर्ट्स एरिना मैदानावर सुरू झालेल्या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जोतिबा रेडेकर, प्रगती रेडेकर, सुमित रेडेकर, विजय रेडेकर आदी मान्यवरांनी फुटबॉलला किक मारुन स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी त्यांना संघातील खेळाडूंची त्यांना ओळख करुन देण्यात आली. ओमकार कुंडेकर, विवेक सनदी, शुभम यादव, अखिलेश अष्टेकर आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत एकूण 12 संघांनी भाग घेतला असून अ गटात-सेंट जोसेफ, डीपी, जैन हेरीटेज, ब गटात-सेंट जोसेफ-संतिबस्तवाड, अंगडी, जैन हेरीटेज ब, क गटात- जैन हेरीटेज सी, झेवियर्स बी., सेंट जोसेफ अ तर ड गटात- सेंट झेवियर्स अ, सेंट जोसेफ ब संतिबस्वाड व डीपी ब या संघांचा समावेश आहे. पहिल्या सामन्यात सेंट झेवियर्सने 5-0 ने विजय मिळविला. दुसऱ्या सामन्यात सेंट जोसेफ संतिबस्तवाड अ ने 6-0 असा विजय मिळविला. तिसऱ्या सामन्यात सेंट झेवियर्स अ, सेंट जोसेफ संतिबस्वाड ब, डीपी अ संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन विजयी सलामी दिली.