सेंट झेवियर्सला फुटबॉलमध्ये दुहेरी मुकुट
सेंट पॉल्स, सेंट जोसेफ संघ विजेते, जिल्हास्तरीय आंतराशालेय क्रीडा स्पर्धा
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने घेण्यात आलेल्या बेळगाव जिल्हास्तरीय प्राथमिक आणि माध्यमिक मुला-मुलींच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत अतुलनीय कामगिरी करताना सेंट झेवियर्स स्कूल संघाने माध्यमिक शालेय मुलांच्या गटाचे व प्राथमिक शालेय मुलींच्या गटाचे अजिंक पद संपादन करत दुहेरी मुकुट संपादन केला. तर सेंट जोसेफ हायस्कूल संघाने माध्यमिक शालेय मुलींच्या गटाचे तर सेंट पॉल्स स्कूल संघाने प्राथमिक शालेय गटाचे विजेतेपद पटकाविले. बुधवारी कॅम्प येथील मराठी विद्यानिकेतन हायस्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालेय मुलाच्या अंतिम फेरीत सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने सर्वोदय हायस्कूल खानापूर संघावर चुरशीच्या लढतीत टायब्रेकरवर 4-1 असा विजय संपादन करत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. मुलींच्या अंतिम फेरीत सेंट जोसेफ हायस्कूल संघाने होनगा येथील महावीर रेसिडेन्सी हायस्कूलवर अटितटीच्या लढतीत 2-1 असा विजय मिळविला.
प्राथमिक गटातील मुलांच्या अंतिम सामन्यात सेंट पॉल्स हायस्कूल संघाने सर्वोदय हायस्कूल खानापूर संघाचा 2-0 असा पराभव करत स्पर्धेची अजिंक्यपद मिळविले. मुलींच्या अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने होनगा येथील महावीर रेसिडेन्सी हायस्कूल संघाचा 2-0 असा पराभव करून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हा सार्वजनिक शिक्षण खात्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जुनेद पटेल, पी.ई.ओ.बद्री, रमेश अलगुडगेकर, सुनिता जाधव, जुलेट फर्नांडिस, चेस्टर रोजारियो, बाळेश, फुटबॉल प्रशिक्षक मानस नायक, लेस्टर डिसोजा यांच्या हस्ते विजेत्या संघांना आकर्षक चषक व प्रशस्तीपत्र व सुवर्ण, रौप्य पदके देऊन फुटबॉलपटूंचा गौरव करण्यात आला. यावेळी फुटबॉल पंच म्हणून अल्लाबक्ष बेपारी, रणजीत कणबरकर, साकिब बेपारी, प्रशांत देवदानम, महेश हगीदाळे, लीना डिसूजा यांनी काम पाहिले.