सेंट झेवियर्स, भरतेश, जी. जी. चिटणीस विजयी
मृदुला सामंत स्मृती चषक फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : एसकेई सोसायटी जीएसएस महाविद्यालय व बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या मृदुला सामंत आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत भरतेशने शेख सेंट्रलचा, जी.जी. चिटणीसने कॅन्टोन्मेंटचा, सेंट झेवियर्सने मुक्तागंण संघाचा पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळविले. तर एमव्हीएमने संत मीराने शुन्य बरोबरीत रोखले.आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावर मृदुला सामंत चषक फुटबॉल स्पर्धेच्या मंगळवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात भरतेश संघाने शेख सेंट्रल संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात दुसऱ्याच मिनिटाला भरतेशच्या स्वयम मलिकच्या पासवर दर्शन नाईकने गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 28 व्या मिनिटाला पूरन रावच्या पासवर दर्शन नाईकने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी भरतेशला मिळवून दिली. या सामन्यात शेख सेंट्रलने गोल करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण त्यांना अपशय आले. दुसऱ्या सामन्यात जी. जी. चिटणीस संघाने कॅन्टोन्मेंट संघाचा 1-0 असा पराभव केला.
या सामन्यात 9 व्या मिनिटाला विराजच्या पासवर अॅजलने गोल करून 1-0 ची आघाडी चिटणीसला मिळवून दिली. या सामन्यात कॅन्टोन्मेंट संघाने गोल करण्याच्या संधी दवडल्या. दुसऱ्या सत्रात 44 व्या मिनिटाला चिटणीसच्या विराजने गोल करण्याची संधी दवडली. 48 व्या मिनिटाला कॅन्टोन्मेंटच्या सुरेश रजपूतने मारलेला फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. शेवटी हा सामना चिटणीसने जिंकला. तिसऱ्या सामन्यात महिला विद्यालय संघाने संत मीराने शून्य बरोबरीत रोखले. या सामन्यात पहिल्या सत्रात 18 व्या मिनिटाला संत मीराच्या पृथ्वीने गोल करण्याची संधी दवडली. 21 व्या मिनिटाला महिला विद्यालयाच्या चैतन्यने मारलेला फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. त्यामुळे पहिल्या सत्रात गोलफलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रातही दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले. चौथ्या सामन्यात सेंट झेवियर्सने मुक्तांगण संघाचा 5-0 असा पराभव केला. चौथ्या मिनिटाला झेवियर्सच्या अर्जुनच्या पासवर आर्सलनने पहिला गोल केला. 8 व्या मिनिटाला अर्जुनने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. 18 व्या मिनिटाला गौरवने तिसरा तर 22 व्या मिनिटाला झियान चौथा गोल करून 4-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 44 व्या मिनिटाला गौरवने पाचवा गोल करून 5-0 अशी आघाडी मिळवून दिली.
गुरुवारचे सामने
- एम. व्ही. हेरवाडकर वि. कनक दुपारी 2 वा.
- केएलई इंटरनॅशनल वि. ज्ञान प्रबोधन दुपारी 3 वा.
- सेंट मेरीज वि. सर्वोदय दुपारी 4 वा.
- केएलएस वि. सेंट पॉल्स सायंकाळी 5 वा.